अमरावती : अमरावती शहरालगत असणाऱ्या लोणटेक येथील शेतात झोपलेल्या शेतकऱ्याची रविवारी पहाटे झोपेतच गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. सुनील सुखदेव सोळंके (38 राहणार गोपाळगव्हाण) असं हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. तर मारेकऱ्यांनी हत्या करून त्याचा मृतदेह शेतापासून शंभर मीटर अंतरावर टाकला होता. सकाळी ही घटना समोर आल्यावर लोणटेक गावात खळबळ उडाली.
मक्त्याने करत होता शेती : लोणटेक लगतच असणाऱ्या गोपाळगव्हाण या गावात मृत सुनील सोळंके हा पत्नीसह मागील काही वर्षांपासून राहत होता. त्याच्याकडं स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसल्यानं उदरनिर्वाहासाठी काही वर्षापासून दुसऱ्याची शेती तो मक्त्याने करत होता. लोणटेक या गावापासून जवळच असणाऱ्या जगदीश केवले यांची 60 ते 70 एकर शेती त्यांनी कसायला घेतली होती. या शेतात सध्या चना पेरणी केली आहे. चना खाण्यासाठी रात्रीच्या वेळी वन्य प्राणी शेतात येत असल्यानं सुनील सोळंके रोज रात्री शेतात झोपायला जायचे. शेतीच्या मध्यभागी त्यांनी मचान बांधलं होतं. या मचानावरच ते झोपले होते. शनिवारी रात्री देखील सुनील सोळंके नेहमीप्रमाणे शेतात रखवालीसाठी गेले, मात्र रविवारी सकाळी घरी परतले नसल्यानं त्यांच्या पत्नीला चिंता वाटायला लागली. दरम्यान सकाळी सुनील सोळंकेंचा मृतदेह शेतापासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती गावात पसरली.