अमरावती Amravati Hindu Morcha : बांगलादेशमधील पीडित हिंदूंच्या सन्मानार्थ आज अमरावती शहरात विराट मोर्चा निघाला. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा, राज्यसभा सदस्य अनिल बोंडे, भाजपाचे कार्यकर्ते तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह विविध संघटना या मोर्चात सहभागी झाल्या. या मोर्चाला संबोधित करताना शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष नानाग्राम नेभनानी यांनी "सरकारनं महिलांना संरक्षणासाठी बंदुक बाळगण्याची परवानगी द्यावी, मी अमरावतीतल्या सर्व महिलांना स्वखर्चानं बंदुक देणार," असं वादग्रस्त वक्तव्य केलं.
महिलांना मी बंदुक देणार : "मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की, त्यांनी महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्यावी. त्यांनी जर ही परवानगी दिली तर, अमरावतीत मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे बंदुक घेऊन देईन. महिलांनी स्वसंरक्षणासाठी आता बंदुक वापरावी. यात दोन-चार चांगली माणसं मारली तरी हरकत नाही, मात्र वाईट माणूस वाचायला नको. अशा प्रकरणात न्यायालयीन खर्चाची जबाबदारी देखील मी स्वतः घेण्यास तयार आहे," असं वक्तव्य नानकराम नेभनानी केलं.
अमरावती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त :अमरावती शहरातून सकाळी 11 वाजता विराट मोर्चा निघणार असल्यामुळं सकाळी सात वाजल्यापासूनच राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, कॉटन मार्केट परिसर, इर्विन चौक अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. इर्विन चौकातून राजकमलच्या दिशेनं जाणारी आणि येणारी वाहतूक एकाच मार्गानं करण्यात आली होती. या मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दंगा नियंत्रण पथक देखील तैनात होतं.