अमरावती Amravati Lok Sabha Elections : खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून एनडीएकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यावरुन माजी खासदार आनंदराव अडसूळ, रवी राणा यांच्यात वर्चस्ववादातून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मात्र "आनंदराव अडसूळ यांना विचारुनच अमरावती लोकसभा मतदार संघाचा निर्णय घेण्यात येणार आहे, असा शब्द अमित शाह यांनी दिला आहे. आम्ही आजही किल्ला लढवत आहोत. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आम्हाला तिकीट न मिळाल्यास सगळे पर्याय खुले आहेत," असा गर्भित इशारा आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिला आहे.
अमरावती मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला :"अमरावती लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला आजही आम्ही लढवतो. शिवसेनेचा उमेदवार असल्यास मतदारांना विचार करावा लागतो. या अगोदरही आनंदराव अडसूळ यांना इथल्या जनतेनं मोठ्या मताधिक्यानंनं विजयी केलेलं आहे. त्यामुळं कोणतीही तडजोड होणार नाही," असा निर्धारही अभिजित अडसूळ यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळं अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांवरुन अद्यापही तिढा सुटला नसल्याचं स्पष्ट झालं. अमरावती मतदार संघ भाजपा, शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
बावनकुळे संपर्कात, आम्हाला 'वरुन' निरोप आलाय :"अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. त्याबाबतच्या भावना आम्ही वरिष्ठांना कळवल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संपर्कात आहेत. त्यांनी वरिष्ठांना आमच्या उमेदवारीच्या दाव्याबाबत कळवलं आहे. आम्हाला वरिष्ठांनीही निरोप दिला आहे. त्यामुळं आम्ही प्रचंड आशावादी आहोत," असं अभिजित अडसूळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.