बच्चू कडूंची पोलिसांशी बाचाबाची अमरावती Bacchu Kadu : अमरावती शहरातील जिल्हा परिषदेच्या सायन्सकोर मैदानावर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं त्यांच्या प्रचारासाठी शाह यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेसाठी आमदार रवी राणा यांच्या वतीनं भव्य मंडप टाकण्यात आला. मात्र, या आगोदरच आमदार बच्चू कडू यांनी मैदान अधिकृतरित्या आरक्षित केलं. त्यामुळं ते मैदानाची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलं. यावरून कडू तसंच पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. या संपूर्ण प्रकरणामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
मंडप कोसळला : अमित शाह यांच्या सभेसाठी घातलेला मंडप कोसळला आहे. मंगळवारी सायंकाळी वादळ आलं आणि त्यात हा मंडप कोसळला आहे. या मैदानात आमदार बच्चू कडू हे ठिय्या देऊन बसले असतानाच अचानक वादळ सुटले. या वादळात मैदानावरील मंडप कोसळला. मंडप कोसळताच प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आणि टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला.
भाजपाच्या सभेला कोणी परवानगी दिली : या वेळी बच्चू कडू यांनी अमरावतीतील सायन्स कोअर मैदान 24 एप्रिलसाठी बुक करण्यात आल्याचा दावा केला. त्यामुळं या मैदानावर दोन दिवस कोणताही कार्यक्रम किंवा सभा घेऊ नये, अशी मागणी कडू यांनी केली. मात्र, याच मैदानावर गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. आम्हाला सभेची परवाणगी मिळालेली असताना भाजपाच्या सभेला कोणी परवाणगी दिलीय़ असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय. त्यानंतर कडूंची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली.
काय आहे प्रकरण? : बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुक यांची 24 एप्रिल रोजी सायन्सकोर मैदानातून प्रचारासाठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. संदर्भात बच्चू कडू यांनी 18 एप्रिल रोजी सायन्स कोअर मैदान बुक केलं होतं. दरम्यान, 22 एप्रिल रोजी सकाळी आमदार रवी राणा यांनी सायन्स कोअर मैदानावर अमित शाह यांच्या सभेसाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळं सायन्स कोअर मैदानावर आमदार बच्चू कडू, प्रहारचे उमेदवार दिनेश बुक यांच्यासह प्रहारचे शेकडो कार्यकर्त्यांनी मैदानावर धडक दिली.
पोलिसांना लोटांगण घालून केला नमस्कार : तुम्ही कायद्याचे रक्षक असून शपथ घेऊन तुम्ही पोलीस खात्यात जनतेच्या सेवेसाठी आले आहात. आता तुमच्या डोळ्यासमोर अन्याय होतोय. अमित शाह यांच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळाली नाही, असं तुम्ही सांगता. मात्र, गृहमंत्र्यांच्या सभेसाठी मैदानावर तयारी करण्याची पोलिसांची भूमिका अतिशय दुर्दैवी असल्याचं कडू यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी पोलीस उपायुक्त शिंदे यांच्यासमोर लोटांगण घालत घटनेचा निषेध केलाय. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
बुधवारी एक लाख कार्यकर्ते धडकणार मैदानावर : बुधवारी अमित शाह यांची सभा मैदानावर अनधिकृतपणे होत असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. ही अनधिकृत सभा आम्ही उधळूण लावू, यासाठी प्रहारचे एक लाख कार्यकर्ते बुधारी सकाळीच मैदानावर धडकणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.
हे वाचलंत का :
- अमरावतीत 'जंग ऐ मैदान'; नवनीत राणा-बच्चू कडू यांच्यातील वाद चिघळला, प्रहार आक्रमक - Science Score Ground
- "पराभवाच्या हताशेनं शिवीगाळ...", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Devendra Fadnavis
- हनुमान चालीसा म्हणणं काँग्रेस सरकारच्या काळात गुन्हा, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024