महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमित शाह महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवणार? - अमित शाह

Amit Shah In Maharashtra : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पाच आणि सहा मार्च रोजी अमित शाह मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्यात असणार असून ते जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सर्वप्रथम अकोला त्यानंतर जळगाव आणि संध्याकाळच्या सत्रात संभाजीनगरमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. तसंच या दौऱ्यादरम्यान महायुतीचा जागावाटपाचा प्रश्न अमित शाह सोडवणार असल्याचं बोललं जातंय.

Amit Shah on two day visit to maharashtra possibility of solving rift of seat allocation in Mahayuti
अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 4:08 PM IST

मुंबई Amit Shah In Maharashtra : केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर, अकोला, जळगाव या जिल्ह्यांचा दौरा आणि आढावा बैठका घेतल्यानंतर अमित शाह आज (5 मार्च) रात्री मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाल्यानंतर त्यांची महायुतीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीला आता फारच कमी कालावधी उरलेला असताना राज्यात महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाही. अशा परिस्थितीत आजच्या बैठकीत अमित शाह हा तिढा सोडवण्याची शक्यता आहे.

आम्हाला आमच्या हक्काच्याच जागा हव्यात : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लढविलेल्या 22 मतदारसंघावर यंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दावा केलाय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं (ठाकरे गट) 18 जागांवर विजय संपादन केला होता. त्यापैकी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आत्ताच्या घडीला 13 खासदार असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ 5 खासदार आहेत. एकीकडं एकनाथ शिंदे गट 22 जागांवर निवडणूक लढण्यावर ठाम असताना दुसरीकडं अजित पवार यांच्या गटाला लोकसभेच्या 10 जागा हव्या आहेत. असं झालं तर उरलेल्या 16 जागांवर भाजपा निवडणूक लढवणार का? हा प्रश्न आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये हे शक्य नसून भाजपा 25 ते 28 जागांच्या खाली निवडणूक लढवणार नाही हे सुद्धा तितकंच स्पष्ट आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही 22 मतदार संघात निवडणूक लढलो आणि 18 जागा जिंकल्या. त्याचप्रमाणे यंदाही आम्ही 22 जागांवर आमचा दावा सांगितलेला आहे. त्यानंतर राज्याच्या समन्वय समितीच्या बैठकीत या जागांवर सविस्तर चर्चा केली जाईल. परंतु आमच्या हक्कांच्या जागावर आमचा दावा कायम राहणार - शंभूराज देसाई, मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते

अजित पवार गटाचा 10 जागांवर दावा : अजित पवार हे सरकारमध्ये आल्यापासूनच पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद राज्यात वाढवण्याबरोबर दुसरीकडं शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं राजकीय वजन कमी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अशातच सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांकडं लोकसभेची रायगड ही एकमेव जागा आहे. या जागेचं नेतृत्व पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे हे करत आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत राजकीय समीकरण बघता अजित पवार गटानं येत्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती, शिरूर, रायगड, सातारा, परभणी, बुलढाणा, धाराशिव, गडचिरोली, माढा आणि हिंगोली या दहा जागांवर निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय. याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करून या जागांसाठी ते आग्रही असल्याचं दाखवून देणार आहेत. तर आज रात्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

महायुतीत अनेक जागांवर वाद : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघावर दवा केला आहे. जो सध्या भाजपाचे रणजीत नाईक निंबाळकर यांच्याकडं आहे. इतकंच नाही तर भाजपानं रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर दावा केलाय. ही जागा शिवसेनेकडं असून उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत. तर दुसरीकडं या जागेवर एकनाथ शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्याचप्रमाणे शिरूर, मावळ, रायगड, संभाजीनगर, परभणी, शिर्डी, यवतमाळ, गडचिरोली आणि मुंबई वायव्य या जागांवर सुद्धा महायुतीमध्ये वाद असल्यानं अमित शाह यांच्या उपस्थितीत हा तिढा आता कशा पद्धतीनं सोडवला जाईल, हा फार मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा -

  1. लोकसभेच्या तोंडावर अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, दिवसभरात काय असणार कार्यक्रम?
  2. गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; विमानतळावर जंगी स्वागत, सभेला तगडा पोलीस बंदोबस्त
  3. परिवारवादाच्या आरोपांवर लालूप्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार! भाजपा नेते हादरले, एक्सवर लिहिलं 'हे' स्लोगन

ABOUT THE AUTHOR

...view details