महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

28 हजार वर्षांपूर्वी मानवानं घेतलं अळूचं पीक; दक्षिण पूर्व आशियातून जगभर झाला प्रसार; जाणून घ्या अळूची कहाणी - Alu Leaves Benefits and History - ALU LEAVES BENEFITS AND HISTORY

Alu Leaves Benefits and History : आपल्या जीभेला वेगवेगळ्या पदार्थांची चटक लागलेली असते. यात अळूच्या वड्या. अळूची भाजी-फतफतं म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतच. मात्र, हा अळू कुठून आला? याचा शोध कसा लागला? तो भारतात कसा आला? या अळूचे काय फायदे आहेत? हे तुम्हाला महिती आहे का? चला तर मग 'ईटीव्ही भारत'च्या या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घ्या...

Alu Leaves Benefits and History
अळू भाजीची कहाणी (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 7:14 PM IST

Updated : Aug 28, 2024, 7:29 PM IST

अमरावती Alu Leaves Benefits and History :नदी, नाल्याच्या काठावर हमखास उगवणारी अळू ही कंदमूळ प्रकरात मोडणारी सुरण कुळातील बारमाही वनस्पती आहे. भाजीसाठी अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन प्रकार आहेत. आता गणपती आणि गौरी उत्सवात महाप्रसादामध्ये अळूच्या वड्यांना खास मान असतो. विशेष म्हणजे, 28 हजार वर्षांपूर्वी मानवानं सर्वात आधी शेतीला सुरुवात केली असताना त्यावेळी अळूचं पीक हे विशेष करून घेण्यात आलं. अळूचा उगम हा दक्षिण पूर्व देशांमध्ये झाला असल्याचं संशोधनात समोर आलं. कोलोकेशिया एसकिलांटा असं अळूचं शास्त्रीय नाव आहे. एकूणच औषधी गुण असणाऱ्या या अळू संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.

अळू भाजीची कहाणी (Source - ETV Bharat Reporter)

या भागात अळूचा उगम :28 हजार वर्षांपूर्वी मानवानं शेतीला सुरुवात केली आणि त्यावेळी ज्या भाज्यांचं उत्पादन घेण्यात आलं, त्यामध्ये अळू देखील असल्याचं संशोधनात समोर आल्याची माहिती वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अर्चना मोहोड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दक्षिण पूर्व आशियामध्ये कंबोडिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया यापैकी कुठल्यातरी एका देशात अळूचा उगम झाल्याचं संशोधनात स्पष्ट होतं तर काही संशोधकांच्या मते भारतात उत्तर पूर्व राज्यात अळूचा उगम झाला असावा असं सांगण्यात येतं. दक्षिण पूर्व आशियामधूनच जगभर अळूचा प्रसार झाला, असं प्रा. डॉ. अर्चना मोहोड म्हणाल्या.

अळूमध्ये असे आहेत औषधी गुण : अळूमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस आहे. यामध्ये असणारी अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी देखील उत्तम दर्जाची आहे. पॉलिफिनोल्स आणि विटामिन सी हे दोन घटक अळूमध्ये आहेत. ज्यामुळं याची अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी उत्तम आहे. डायबिटीज, हृदयविकार यावर अळू अतिशय गुणकारी ठरतो. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळं पचनासंबंधी असणाऱ्या विकारांवर देखील अळू हे गुणकारी औषध आहे. स्तनदा मातांसाठी अळूची पानं उपयुक्त आहेत. किड्यांनी दंश केला असल्यास तसंच सांधेदुखी आणि वजन कमी करण्यासाठी देखील अळू ही वनस्पती गुणकारी आहे. अळूची पानं शरीरात रक्त वाढवण्यास मदत करतात.

अळू खाल्ल्यानं घशाला सुटते खाज :अळू खाल्ल्यामुळं घशाला खाज सुटते. हा त्रास अतिशय वेदनादायक असतो. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्सालेटचे स्फटिक असतात. हे स्फटिक सुईच्या आकाराची असल्यानं ते गळ्याला आणि जिभेला टोचतात. यामुळं घसा खवखवतो. अळू खाल्ल्यामुळं हा त्रास होत असल्यानं अनेक जण अळूची भाजी करणे, खाणे टाळतात. अळू खाल्ल्यानं असा त्रास होत असला तरी हा त्रास होऊ नये याकरता अळू शिजवण्याच्या खास पद्धती आहेत. अळूला चांगलं शिजवून, वाफवून खाल्लं तर कुठल्याही प्रकारचा त्रास अळू खाल्ल्यानं होत नाही. चिंच किंवा इतर आंबट पदार्थांसह अळू शिजवले की त्यामध्ये असणारं कॅल्शियम ऑक्सालेट निष्प्रभ होतात आणि अळू खाल्ल्यानं कुठलाही त्रास होत नाही.

धार्मिक विधीत अळूला महत्त्व :गौरी महालक्ष्मीच्या महाप्रसादाला अळूच्या वड्यांना मान आहे. मणिपूर राज्यात असणाऱ्या मैतेई जमातीमध्ये देखील अळूची पानं आणि कंद यांना काही धार्मिक विधींमध्ये महत्त्व आहे. हवाई या देशामध्ये देवी देवतांनी एका मुलाला जन्म देताच त्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी त्या मुलाला जमिनीत पुरण्यात आलं. त्या ठिकाणी अळू ही वनस्पती बहरली. यामुळे अळूला देवाची वनस्पती म्हणून त्या ठिकाणी मान्यता आहे. यामुळेच हवाई या देशात धार्मिक विधीमध्ये अळूला महत्व असल्याची माहिती देखील प्रा. डॉ. अर्चना मोहोड यांनी दिली.

ग्लुटेन फ्री बेकरी पदार्थांमध्ये अळूचा वापर :बेकरी पदार्थांमध्ये ग्लुटेनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. या ग्लुटेनमुळे वजन झपाट्यानं वाढतं. आता मात्र ग्लुटेन फ्री बेकरी पदार्थांसाठी अळूच्या कंदांपासून तयार केलेलं पीठ हे उपयुक्त ठरू शकतं. या संदर्भात संशोधन सुरू आहे. बेकरी प्रॉडक्टमध्ये अळूचं पीठ वापरण्यास अनेक ठिकाणी सुरुवात देखील झाली असल्याची माहिती प्रा. डॉ. अर्चना मोहोड यांनी दिली.

हेही वाचा

  1. हैदराबादच्या एआयजीच्या डॉक्टरांनी केला चमत्कार, डोळ्याच्या पापणीमार्गे काढला ब्रेन ट्यूमर - Brain Tumor Removed Through Eyelid
  2. युरिक ॲसिड समस्येनं त्रस्त आहात? मग 'या' पदार्थांना करा बाय-बाय - Uric Acid Reducing Foods
  3. आरोग्यासाठी कोणती भांडी चांगली? मातीच्या भांड्याचे फायदे काय! - Best Utensils for Cooking
Last Updated : Aug 28, 2024, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details