मुंबई - विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागलेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अनेक उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केलेत. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. तिथे शिवसेना (ठाकरे) गटाकडून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी मिळालीय, तर मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र अद्यापपर्यंत महायुतीने या ठिकाणी उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, आज (गुरुवारी) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केलंय. खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे तसेच बंधू तेजस ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते.
मशाल धगधगणार अन् महाराष्ट्र जिंकणार :आदित्य ठाकरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केलीय. मी दुसऱ्यांदा अर्ज दाखल करतोय, याचा मला आनंद होतोय आणि कुणाला निवडून द्यायचे हे आता जनतेने ठरवलंय, आता मशाल धगधगणार आणि महाराष्ट्र जिंकणार, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत सत्तेचा गैरवापर होताना सर्वांनी पाहिले. विविध यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना नाहक त्रास दिला गेलाय. परंतु आता या निवडणुकीत महाविकास आघाडीच जिंकणार आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय. तसेच आधीच्या सरकारमध्ये जे रखडलेले प्रश्न होते. ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागलेत. वरळीतील पुनर्विकासाचा प्रश्न आणि गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तसेच पहिल्या टप्प्यात डिसेंबरमध्ये वरळीकरांसाठी लाखो घरं मिळणार आहेत. यासह पोलिसांना हक्काची घरं वरळीतच मिळाली पाहिजेत, यासाठी काम करणार, असंही ते म्हणालेत. तुम्ही मागच्या वेळेला पहिल्यांदा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा राज ठाकरेंनी येथे उमेदवार दिला नव्हता. ठाकरे घरातील पहिला व्यक्ती निवडणूक लढवतो म्हणून त्यावेळी त्यांनी उमेदवार दिला नसल्याचं सांगितलं होतं. परंतु माहीम मतदारसंघामध्ये तुमचे भाऊ अमित ठाकरेंच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिलाय, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला असता, शेवटी आम्ही निवडणूक म्हणून लढवतोय. पण मी अमित ठाकरेंना बंधू या नात्याने निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. पण मला मात्र निवडून द्यायचं हे जनतेने ठरवलंय, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्तिप्रदर्शन :उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे हे आपले आजोबा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर नतमस्तक झालेत. तसेच आई-वडील उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे आशीर्वाद घेतलेत. यानंतर वरळीत मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय. या मिरवणुकीत हजारो शिवसैनिक तसेच पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता. वरळीतील कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत नृत्य सादर केलंय. बँडबाजा पथक तसेच नाशिक ढोलबाजा यांच्या तालावर शिवसैनिकांनी आणि महिलांनी ठेका धरलाय. यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय.
अमित ठाकरेंच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिलाय; आदित्य ठाकरे म्हणतात... - MAHIM ASSEMBLY CONSTITUENCY
माहीम मतदारसंघांमध्ये भाऊ अमित ठाकरेंच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिलाय, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला असता ते म्हणाले, अमित ठाकरेंना बंधू या नात्याने निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो.
आदित्य ठाकरे (ETV Bharat File Photo)
Published : Oct 24, 2024, 4:36 PM IST
|Updated : Oct 24, 2024, 5:51 PM IST
Last Updated : Oct 24, 2024, 5:51 PM IST