मुंबई- Lok sabha election 2024 : आज राज्यात ११ लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत असून यामध्ये बारामती या मतदार संघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे. पवार कुटुंबीयांसाठी ही लढत अतिशय महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (भावजय) यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (नणंद) असा हा सामना रंगला आहे. अजित पवार यांच्या कुटुंबाविरोधात संपूर्ण शरद पवार कुटुंब व नातेवाईक एकवटले असून आज मतदानाच्या दिवशी अजित पवार यांनी आपल्या मातोश्री आशाताई पवार यांच्याबरोबर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, 'मेरे पास माँ है', असं म्हणाले. अजित पवारांचा हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या 'दिवार' चित्रपटातील डायलॉगशी जोडला जात आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांनी 'माँ का आशीर्वाद बडा होता है', असं म्हटल्याने बारामतीत 'माँ का आशीर्वाद', वरून चर्चा रंगली आहे.
मेरी माँ मेरे साथ है
बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ८६ वर्षीय मातोश्री आशाताई पवार व बारामतीतील उमेदवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याबरोबर काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. यानंतर संपूर्ण पवार कुटुंब तुमच्या विरोधात गेलं असताना तुमची आई तुमच्या बरोबर आहे, असं अजित पवार यांना विचारलं असता. ते म्हणाले की, पवार कुटुंबामध्ये सर्वात मोठी त्यांची आई आहे. आज त्यांची आई त्यांच्याबरोबर आहे. अशात बाकीच्यांचं काय सांगताय, 'मेरी माँ मेरे साथ है'. असा डायलॉग अजित पवारांनी लगावला आहे. अजित पवार यांच्या या डायलॉग नंतर राज्यभर या डायलॉगची चर्चा सुरू झाली. अजित पवारांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता ते म्हणाले की, मला वाटतं अजित पवार यांनी फार चांगलं उत्तर दिलं आहे. कारण शेवटी आई असणं व आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशिर्वाद काय असू शकतो. ज्याप्रकारे बारामतीमध्ये असं चित्र तयार करण्यात आलं की, अजितदादा एकटे पडले आहेत. परिवाराने त्यांना वाळीत टाकलं आहे. सर्वांनी मिळून त्यांना एकट पाडलं आहे, अशा परिस्थितीमध्ये, 'माँ का आशीर्वाद, इससे बडा और क्या है?' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.