पुणे Ajit Pawar On Sanjay Raut :शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर फजीत पवार गट अशी टीका केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, त्यांनी 'विनाशकाले विपरीत बुद्धी' असं म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. पुण्यात शुक्रवारी पुणे मर्चेंटस को-ऑप बँक लि. शतक महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा आणि शतकोत्सवी बोधचिन्ह अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते.
राजकारणात आल्यापासून दिली तरुणांना संधी :यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुम्ही तरुणांना राजकारणात संधी देणार का असं विचारलं असता, ते म्हणाले की "मी राजकारणात आलोय, तेव्हापासून तरुणांना संधी देत आलोय. आत्ताच्या आमदारांमध्ये तरुण मोठ्या संख्येनं आहेत. पुढं ही मी तरुणांना संधी देणारचं," असं यावेळी त्यांनी सांगितलं. आमदार रोहित पवार यांना जी ईडीची नोटीस आली, त्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की "त्याबाबत मला माहित नाही. ईडी ही केंद्रीय यंत्रणा आहे. मागे मला ही नोटिसा आलेल्या आहेत. त्यात तथ्य असेल तर अडचणी येतात, नसेल काही तर अडचण येत नाही," असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यावेळची अवस्था आठवली असेल :आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर इथं भावुक झालेले पाहायला मिळाले. यावर अजित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की "आता तुम्ही जर पत्र्याच्या घरात, छोट्याश्या घरात राहिला असाल, त्यांना त्यांची त्यावेळची अवस्था आठवली असेल. पंतप्रधान झाल्यावर आपण अनेकांना घरं देतोय. हे पाहून भावुक झाले असतील. मी पण आधी पत्र्याच्या घरात, सारवलेल्या घरात राहायचो, नंतर बंगला झाला. काळानुरूप परिस्थिती बदलत असते. आता मोदी पंतप्रधान आहेत, मात्र पूर्वीचे दिवस कोणीच विसरत नाही. ते आज त्यांना आठवलं असेल, म्हणून ते भावुक झाले असावेत," असं यावेळी अजित पवार म्हणाले.
शरद पवार यांना लगावला टोला :कार्यक्रमात अजित पवार यांनी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की "बँकांमध्ये तरुणांना संधी दिली पाहिजे, नाहीतर वयस्कर लोक लवकर संधी देत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. तसेच "सहकारी क्षेत्रामध्ये जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला लोक निवृत्त करत नाहीत, तोपर्यंत ती व्यक्ती पदाला चिकटून राहते. परंतु त्यामुळे तरुणांवर मात्र अन्याय होतो. तरुण या क्षेत्रामध्ये येत नाहीत. तरुण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर सहकार युथ कायदा तयार करण्यात येईल आणि याबाबतचा विषय लवकरच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट समोर मांडण्यात येईल," अशी माहिती देखील यावेळी अजित पवार यांनी दिली.