मुंबई-महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येतेय. मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेनंतर आता मंत्रिपदाच्या विभाजनावरून वाद सुरू झालाय. दरम्यान, आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह शरद पवारांची भेट घेतलीय, त्या भेटीवर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार, प्रफुल्ल पटेल किंवा पवार साहेबांना संकटकाळात सोडून गेलेले अनेक लोक असतील. पवार साहेब हे महान व्यक्तिमत्त्व आहे. या महाराष्ट्राचा आधारवड आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय निष्ठावंत असतील किंवा अन्य असतील. पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही. पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे. जे त्यांना सोडून केले, त्यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीकाटिपण्णी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय. संजय राऊत दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवारांनी भेटीचं कारण सांगितलं :खरे तर आज शरद पवार यांचा 84 वा वाढदिवस आहे. काकांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतल्याचे अजित पवार म्हणालेत. त्यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी भेटीनंतर सांगितले. मात्र, दोन्ही नेत्यांमधील ही भेट बराच काळ चालली.