अहिल्यानगर :अहमदनगरचं नामांतरण आता 'अहिल्यानगर' करण्यात आलंय. राज्य सरकारनं यासंबंधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलाय. केंद्र सरकारकडून मंजुरी आणि अंतिम अधिसूचना शुक्रवारी (4 ऑक्टोबर) निघताच, शनिवारी तातडीनं राज्य सरकारनं अधिसूचना काढून अहमदनगर शहराचं नाव 'अहिल्यानगर' केलं. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नामांतराबाबत सरकारनं अधिसूचना काढली असली तरी नामांतराला विरोध करत काही जणांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यामुळं यात कायदेशीर गुंता कायम असल्याचं दिसून येत आहे. मात्र, तूर्तास राज्य सरकारनं अधिसूचना काढून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवादाची लढाई जिंकल्याचं म्हणावं लागेल.
शहराचा इतिहास : अहमदनगरचं 'अहिल्यानगर' केल्यानंतर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर काहींनी नामांतराला विरोध करत थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अहमदनगर शहर हे देशातील काही प्रस्थापित शहरांपैकी एक आहे. या शहराची स्थापना 'मलिक अहमद निजामशाह' यांनी 28 मे 1490 रोजी केली. अहमदनगर शहराच्या स्थापनेला तब्बल 534 वर्षे झाली. निजाम अहमदच्या नावावरून शहराला अहमदनगर नाव देण्यात आलं. अहमदशाहानं आपल्या कार्यकाळात शहरात अनेक आकर्षक वास्तू निर्माण करून नागरिकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळं एक उत्तम प्रशासकाच्या नावानं असलेल्या अहमदनगर शहराचं नाव बदलू नये, असं एका वर्गाचं म्हणणं आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील चौंडी इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाल्यामुळं जिल्ह्याला त्यांचं नाव द्यावं, अशी आग्रही मागणी होती.
राज्यातील महत्त्वाचं शहर : 'अहिल्यानगर' हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर आहे. कापड बाजार खरेदी आणि बेकरी उत्पादनांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. येथे भारतीय लष्कर प्रशिक्षण, देशातील मुख्य आर्मी ऑफिस व रणगाडा केंद्र आहे. या शहराची स्थापना मलिक अहमद निजामशाह यांनी 28 मे 1490 रोजी केली. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणारा राजा, सेनापती, प्रधान आणि काझी या सर्वांच्याच नावात अहमद होतं.