अहमदनगर (शिर्डी)Utkarsha Rupwate Vanchit Entry:शिर्डी लोकसभा मतदारसंघ गेल्या 20 वर्षांपासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून या जागेवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मिळण्यासाठी विशेष आग्रह धरला होता; मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्कर्षा रुपवते यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त करीत पत्रकार परिषदेत त्यांनी अन्य मार्ग स्वीकारण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी काल अपेक्षेप्रमाणे अकोला येथे जाऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला.
धोक्याची घंटा :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांचा वंचित मधील पक्षप्रवेश केवळ काँग्रेसलाच धक्का नसून महाविकास आघाडीचे (उबाठा गटाचे) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना धोक्याची घंटा आहे. कारण उत्कर्षा रुपवते या काँग्रेसमधील उत्तर नगर जिल्ह्यात विशेषतः अकोले, संगमनेर आदी भागातील मोठ्या नेत्या आहेत. अनेक वर्षे काँग्रेस निष्ठावान म्हणून काम करताना त्यांनी पक्षीय राजकारणा बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आदिवासी यावर बरेच काम करत स्थानिक जनसंपर्क ठेवलेला आहे. अर्थात त्यांच्या माध्यमातून मिळणारी मते ही महाविकास आघाडीच्या उमेदवारास म्हणजे भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळणार होती. ती मते आता एकगठ्ठा वाकचौरे यांच्यापासून दुरावणार आहेत. तर वंचितच्या उमेदवार म्हणून त्यांना अर्थात महाविकास आघाडीकडे जाणारी वंचितच्या मतांच्या टक्यात वाढ होऊन त्याचाही फटका वाकचौरे यांनाच बसण्याची शक्यता अधिक आहे. या परिस्थितीत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना याचा कसा फायदा मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
तिरंगी लढत होणार :शिर्डी लोकसभा मतदारसंघाची लढत ही काल पर्यंत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या भोवतीच फिरत होती. त्यात खासदार लोखंडे यांच्याबद्दल मतदारांमधील नाराजीचा सूर समाज माध्यमातून स्पष्टपणे दिसून येत होता. लोखंडे यांच्याबद्दल अनेक तक्रारी महायुती मधील नेत्यात बोलल्या जात होत्या. खुद्द पालकमंत्री त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, नंतर लोखंडे यांनी विखे परिवाराशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती असल्याने आणि विखे यांनीही मतभेदांपेक्षा उमेदवार निवडून आणणे त्यांच्या राज्यातील राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याने कामाला सुरुवात केली होती; मात्र जनतेतील रोष स्पष्टपणे दिसत असल्याने आता उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केल्याने सदाशिव लोखंडे यांना हायसे वाटले. वाकचौरे यांची मात्र नाही म्हटले तरी धाकधूक वाढली असणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता दुरंगी ऐवजी तिरंगी लढत होणार आहे.