मुंबईChhagan Bhujbal :लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसलाय. राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. पक्षाने घेतलेले निर्णय मान्य करावे लागतात. तसंच आपण जे ठरवलं ते होतंच असं नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या नावाचा निर्णय सर्वानुमते :राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल मंत्रिमंडळातील सदस्य आणि सुनील तटकरे, प्रफुल पटेल अशी आमची सगळ्यांची बैठक झाली. त्यात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं. मी देखील इच्छुक होतो. त्याबरोबर आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी बरेचजण इच्छुक होते. माध्यमातून 13 जण इच्छुक असल्याचं समजतं; पण तेरा जणांना उभं करणं शक्य आहे का?सगळ्यांनी निर्णय घेतला की त्यांना उभं करायचं. पक्षाचा निर्णय हा सर्वांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांच्या नावाचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.
विरोधीपक्ष अर्ज दाखल करणार नसल्याचा विश्वास :पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चा असून छगन भुजबळ नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, तसं काहीही नाही. आपण नाराज नाही. सगळ्यांनी बसून हा निर्णय घ्यायचा असतो, तो घेतला आहे. तसंच प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते असं नाही, असंही भुजबळ म्हणाले. उमेदवारी घोषित करण्यासाठी वेळ लागला, यावर भुजबळ म्हणाले की, वेळ पाहून प्रचार करायला थोडंच जायचं. या निवडणूक प्रक्रियेत सगळे आमदार मतदान करणार आहेत. महायुतीकडे तितके उमेदवार आहेत. विरोधी पक्ष काही अर्ज दाखल करणार नाही, असा विश्वास भुजबळ यांनी बोलून दाखवला.
कालच्या बैठकीला होतो :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, तटकरे आणि पटेल यांनी स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखा पक्ष चालवत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये डावललं जात असल्याचंही त्यांनी बोललं होतं. यावर छगन भुजबळ म्हणाले की, कालच्या संध्याकाळच्या बैठकीला आपण उपस्थित होतो. बघा मग मला कुठे डावडलं, असा प्रतिसवाल त्यांनी माध्यमांना विचारला.