मुंबई - शालेय अभ्यासक्रमात येत्या वर्षापासून सीबीएसई प्रमाणे अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. तर छत्रपती शिवरायांनंतरचा इतिहास हा अधिक विस्तृतपणे समजावा यासाठी पेशवेकालीन इतिहासाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पेशव्यांच्या काळात जातीयवाद आणि ब्राम्हण्य याला पराकोटीचं महत्त्व देण्यात आलं होतं. त्यामुळे छत्रपती घराण्याचा इतिहास अधिक प्रकर्षाने समोर यावा आणि पेशव्यांकडे राज्य कसे गेले? हे सुद्धा यावे, असं मत इतिहास तज्ञांनी मांडलं आहे.
राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलण्यात येत असून येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तो लागू करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे मराठी विषय हा अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही विद्या शाखा निवडली तरी त्यांना मराठी विषय अनिवार्य राहणार असल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं. मात्र पेशवाईच्या काळात राज्यातील जातसंघर्ष शिगेला पोहोचला होता, कर्मकांड वाढलं होतं, मराठ्यांच्या हातातील सत्ता ब्राह्मणांकडे आली होती. त्याला पुरोगामी विचारांच्या लोकांचा आक्षेप असल्याने या इतिहासाच्या समावेशाबाबत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
छत्रपती शिवरायांनंतरचा इतिहास अभ्यासक्रमात - शालेय अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अंतर्भाव आहे. मात्र छत्रपती शिवरायांनंतर मराठा साम्राज्य भारतभरात विविध ठिकाणी कसं पोहोचलं याचा विस्तृत इतिहास नाही. हा विस्तृत इतिहास अभ्यासक्रमामध्ये यावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत असं केसरकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पेशव्यांनी अटकेपार लावलेले झेंडे आणि साम्राज्य कसं वाढवलं याचा इतिहास अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. मनुस्मृतीच्या श्लोकाचा अभ्यासक्रमात झालेला समावेश राज्यातील पुरोगामी विचारवंतांना आणि विरोधकांना रुचला नाही. त्यावर जोरदार टीका झाली. त्यामुळे आता पेशवाईच्या विस्तृत इतिहासाच्या समावेशाबद्दल इतिहासतज्ञ आणि राजकीय नेत्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.