मुंबई - दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आल्याची घोषणा भाजपा नेते, आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या मुद्द्यावर कालपासून राजकारण चांगलंच तापलेलं असताना हा निर्णय घाई घाईत घेतला गेला असल्याची टीका शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसंच तुम्हीच पाठवलेल्या नोटिसी विरोधात तुम्हीच आंदोलन करत असल्यानं ही हास्यास्पद बाब असल्याचा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हिंदूंची मंदिरे पहिली धोक्यात -दादर पूर्व येथील रेल्वे परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या पाडकामासाठी नोटीस आल्यानंतर मुंबईत मंदिरे सुद्धा सुरक्षित नाहीत अशा पद्धतीची टीका उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणावरून राजकारण तापलं असताना आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती दिल्याची घोषणा भाजपा नेते, आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली. यावरून हे भाजपाच्या लोकांनी तयार केलेलं नाटक असून या पाडकामाला घाईघाईत दिलेली स्थगिती असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आम्ही ज्या पद्धतीने हा विषय हाती घेतला त्यानंतर भाजपाचे दुतोंडी आणि निवडणुकीपुरतं असलेलं हिंदुत्व उघडं पडलं असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. निवडणुकीपुरतं हिंदूंना वापरलं जातं. परंतु निवडणुकीनंतर भाजपाचं सरकार स्थापन झाल्यावर हिंदूंची मंदिरं पहिली धोक्यात येतात. यातच हे हनुमान मंदिर सुद्धा होतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबईतील रस्ते घोटाळा - आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून मुंबईतील १२ हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा आम्ही जनतेसमोर आणला. यामध्ये घटनाबाह्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही तत्कालीन पालकमंत्र्यांचा सुद्धा हात आहे. या तिघांनी हा घोटाळा केला की नाही ते मला माहीत नसून यामध्ये अनियमितता असून या तिघांची अकार्यक्षमता सुद्धा दिसून येते. या प्रकरणात अद्यापही सरकारकडून उत्तर आलं नसून जोपर्यंत या प्रकरणाचं स्पष्टीकरण होत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश करू नये, अशी मागणी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
यूजर फी ला विरोध - मुंबईत गेल्या दोन वर्षापासून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उचलले जात नाहीत. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कचरा गोळा करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक घरावर यूजर फी लावावी लागणार आहे. असं मुंबई महानगरपालिकेनं राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर सांगितलं आहे. परंतु आतापर्यंत जे झाले नाही, ते आता तुम्ही का करत आहात? मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तसेच्या तसे आहेत. त्या ढिगार्यांसाठी तुम्ही आम्हाला पैसे देणार आहात का? मग तुम्ही यूजर फी का लावत आहात? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला असून यूजर फी ला त्यांनी विरोध केला आहे.
- हेही वाचा...
- अनधिकृत असल्याचं सांगत हमालांनी बांधलेल्या 80 वर्षे जुन्या मंदिराला मध्य रेल्वेची नोटीस, भाविकांमध्ये संताप
- बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा- आदित्य ठाकरे