मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेमुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलंय. त्यामुळे ही योजना महायुतीसाठी क्रांतीकारी योजना ठरली आहे. दरम्यान, या योजनेचा सहावा हफ्ता डिसेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासून यायला सुरुवात झाली आहे. पण या योजनेचा महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे. याबाबत काही सरकारला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर सरकारकडून लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय.
तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत पाच प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळं विविध आणि वेगवेगळ्या निकषांवर त्या अर्जांची छाननी होणार आहे. काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आल्या आहेत, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून या योजनेचा लाभ घेत आहेत, मात्र आता त्या महिला पात्र नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. पण हे करत असताना, कुठेही मूळ जीआरमध्ये बदल होणार नसल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं.