मुंबई Actor Govinda news - अभिनेता तथा शिवसेना नेता गोविंदानं चुकून रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यावेळी पायाला गोळी लागल्यानं अभिनेता गोविंदा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली.
अभिनेता गोविंदा जखमी झाल्यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी गोविंदाची रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला. गोळी लागल्यानं गोविंदाच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. त्याला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा कोलकात्याला रवाना होण्याच्या तयारीत होते. गोविंदा आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत होते. त्यावेळी त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर पडले. तेव्हा एक गोळी त्यांच्या पायाला लागली. डॉक्टरांनी पायातील गोळी काढली आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. ते सध्या रुग्णालयात आहेत-गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हान
शिवसेनेचे स्टार प्रचारक-अभिनेते गोविंदानं २८ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलाय. त्याला मुंबई पश्चिम-उत्तर मतदार संघातून गोविंदा यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, गोविंदाला उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र, गोविंदानं लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून काम केले.
राम नाईक यांनी गोविंदावर केली होती टीका-गोविंदानं शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्याच्यावर टीका केली होती. ईटीव्ही भारतशी बोलताना राम नाईक म्हणाले होते, "गोविंदानं राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, शिवसेनेत प्रवेश करून राजकारणात सक्रिय झालेत. त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश केल्यामुळे ते खोटारडे असल्याचं दिसून आलं," असा त्यांनी टोला लगावला होता.
मुख्यमंत्र्यांनी गोविंदाच्या प्रकृतीबाबत केलेली विचारपूस-अभिनेता तथा शिवसेना नेते गोविंदाच्या प्रकृतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली. त्यांनी सांगितलं, ""मी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी, स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकारसह जनतेच्या वतीनं सदिच्छा दिल्या आहेत. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री दिली आहे. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत."
हेही वाचा-