मुंबईAbhishek Ghosalkar :शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा या स्वघोषित समाजसेवकाने त्याच्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई यानं फेसबुक लाईव्ह दरम्यान पाच गोळ्या झाडल्या होत्या. घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिसनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय.
भाजपा आमदार नितेश राणेंचा खळबळजनक दावा : अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते करत आहेत. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी एका व्हिडिओद्वारे खळबळजनक दावा केला आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या उद्धव ठाकरे गटातील टोळीयुद्धाचा परिणाम असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
ठाकरे गटात टोळीयुद्ध :एका बाजूला आदित्य ठाकरे तर, दुसरीकडे संजय राऊत यांच्यात टोळीयुद्ध सुरू आहे. आरोपी मॉरिस हा काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या न्याययात्रेच्या तयारीत होता. मॉरिस नेहमी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बॅनर का लावत होता?, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊत ज्या प्रकारे तेजस ठाकरेंचा प्रचार करत आहेत, त्यामुळं आदित्य ठाकरेंच्या गोटात नाराजी वाढत आहे. त्यामुळं हे टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणात वाढलंय. मॉरिस तसंच संजय राऊत यांच्यातील संभाषणाचा सीडीआर तपासण्याची मागणी राणेंनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःकडे बघावं. ठाकरे गटानं आधी टोळीयुद्ध थांबवावं. मगच महायुती सरकारवर टीका करावी, अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.