छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साड्यांचं वाटप केलं. मात्र, गावातील महिलांनी एकत्र येत या सगळ्या साड्यांची होळी केल्यानं एकच खळबळ उडाली. या घटनेत महिलांच्या संतापामागं वेगळंच कारण असल्याचं समोर आलं.
दोन वेगवेगळ्या घटनांमुळं वाद : सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे शनिवारी रात्री व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्याख्यान देणारे व्यक्ती बांगलादेश येथील घुसखोरीबाबत बोलत होते. तेवढ्यात आमच्या समाजाची बदनामी कशाला करता? असं म्हणत एका महिलेनं चप्पल घालून मंदिरात प्रवेश केला. काही महिलांनी तिला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या महिलेनं अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्या कशा चालतात? असं म्हणत गोंधळ घातला. त्यावर संतप्त झालेल्या दोन गावातील महिलांनी भर रस्त्यात वाटलेल्या साड्यांची होळी करत आपला रोष व्यक्त केला. तर याच गावात काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांचे मोबाईल स्टेटस ठेवले म्हणून एका युवकाला मारहाण करण्यात आली होती. या दोन्ही घटनांचा राग ठेवत गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांनी महिलांना भेट दिलेल्या साड्यांची होळी केली.