महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील प्रदूषणाला मुख्यमंत्री आणि त्यांची बिल्डर लॉबी जबाबदार, आदित्य ठाकरे यांचा आरोप - महाराष्ट्र राजकारण

Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची बिल्डर लॉबी जबाबदार आहे, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज (28 जानेवारी) आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघात खास पोलिसांसाठी 'एक धाव खाकीसाठी' या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रदूषणाच्या विषयावरुन राज्य सरकारवर टीका केली.

Aditya Thackeray blames
आदित्य ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 4:06 PM IST

आदित्य ठाकरे मुंबईतील प्रदूषणावर बोलताना

मुंबई Mumbai Pollution : दिवसेंदिवस वाढत जाणारं मुंबईतील प्रदूषण हा सध्या मुंबईकरांसोबतच प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महानगरपालिका तसेच राज्य सरकार आपल्या परीनं प्रयत्न करत असतानाच, जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम देखील राबवले जात आहेत. (Builder Lobby in Mumbai) मुंबईतील प्रदूषणाचे मुख्य कारण हे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं बांधकाम असल्याचं बोललं जातं. (Worli Marathon) या बांधकाम व्यवसायिकांना पालिकेने वारंवार नोटिसा देऊन देखील हे व्यावसायिक पालिकेचे आदेश धाब्यावर बसवत असल्याचं आढळून आलं आहे. यावरून आता आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जबाबदार धरलं आहे.

पोलीस कॅम्प ग्राउंडवर मॅरेथॉन:आदित्य ठाकरे यांनी आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघात खास पोलिसांसाठी 'एक धाव खाकीसाठी' या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. वरळी येथील पोलीस कॅम्प ग्राउंडवर ही मॅरेथॉन पार पडली. यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना मुंबईतील प्रदूषणाबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, "या पोलीस मॅरेथॉनचे आयोजन आम्ही दरवर्षी वरळीमध्ये करत असतो. यात पोलिसांसोबतच त्यांच्या परिवारातील सदस्य देखील मोठ्या संख्येनं सहभागी होतात. त्यामुळे एकूणच आनंदाचं वातावरण असतं. ही मॅरेथॉन वरळी पोलीस कॅम्प सोबतच वरळी सी फेस येथून पुन्हा पोलीस कॅम्पमध्ये येते. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि त्यांचे परिवार सहभागी होतात."

प्रदूषणाचं उत्तर कोणाकडेही नाही:निरोगी आरोग्याचा संदेश देत या पोलिसांच्या मुलांनी देखील यात सहभाग घेतला होता. मुंबईत दररोज हजारो लोकं सकाळी सकाळी जॉगिंग, योगा करण्यासाठी घराबाहेर पडत असतात. मात्र, त्यांना प्रदूषणाचा सामना करावा लागतो. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "यावर मी अनेकदा बोललो आहे. प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, उत्तर कुणाकडून येत नाही. मुंबईत दररोज लाखो लोक चालत असतात, धावत असतात, योगा करत असतात. पण, हे सर्व करताना आपण जो श्वास घेतो तो शुद्ध आहे का? हा प्रश्न आम्ही सातत्याने विचारत आलो आहोत. पण, उत्तर कोणी देत नाही.

त्यांना रेसकोर्स गिळायचं आहे:आता राज्य सरकारचा डोळा रेसकोर्सवर आहे. तिथे त्यांना अंडरग्राऊंड कार पार्किंग व्यवस्था करायची आहे. आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या बिल्डर मित्रांना रेसकोर्स गिळायचं आहे. त्यामुळे इथल्या प्रदूषणाला मुख्यमंत्री आणि त्यांची बिल्डर लॉबी जबाबदार आहे.", असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हेही वाचा:

  1. पंतप्रधानांना मातृभाषेचं प्रेम लपवता येत नाही, मग आपण का मराठीचं प्रेम लपवावं : राज ठाकरे
  2. बिहारच्या राजकीय संघर्षात लालू यांच्या मुलीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, भाऊ तेजस्वीचं केलं कौतुक
  3. लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार भाजपासोबत; राजकीय पक्षांच्या बैठकींचं सत्र सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details