कोल्हापूर - ग्रामीण संस्कृतीचा बाज असलेला 'गाभ' मराठी चित्रपट 21 जून रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. वेगळं कथानक असल्यामुळं मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, बेळगाव सीमा भागातील लक्ष्मण पाटील या तरुणांन कर्नाटकात मराठी भाषेचं संवर्धन आणि प्रसार व्हावा यासाठी या चित्रपटाचं तिकीट घेऊन आपल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी 20% दरात सवलत देऊन अभिनव उपक्रम राबवला आहे. नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास समजावा यासाठी हॉटेलचा लूकही किल्ल्याप्रमाणे करण्यात आला असून मराठी भाषेसाठी धडपडणाऱ्या या तरुणाचं सीमा भागात कौतुक होत आहे.
अनुप जत्राटकर लिखित आणि दिग्दर्शित 'गाभ' हा मराठी चित्रपट नुकसान प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात गावगाड्याचा आर्थिक कणा असलेल्या दुग्ध व्यवसायाच्या वास्तवावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. रेड्यांची कमी होणारी संख्या यामुळे म्हैस गाभण राहण्यासाठी करावी लागणारी वणवण या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अस्सल ग्रामीण प्रेम कथाही चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न सीमा भागातीलच उदयन्मुख लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक पुरस्कार जाहीर झाले. राज्य शासनाच्या वतीनं कांन्सच्या जागतिक चित्रपट महोत्सवात 'गाभ' सिनेमाचा प्रीमियर पार पडला होता. यामुळं प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. आता सीमा भागात लक्ष्मण पाटील या तरुणांना मराठी भाषा सर्वदूर पोहचावी यासाठी राबवलेला उपक्रमाचं कौतुक होत असून यापूर्वी अमोल कोल्हे यांची भूमिका असलेला गरुडझेप, तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तान्हाजी हा चित्रपटही लक्ष्मण पाटील यांनी मराठी भाषकांसाठी मोफत दाखवला होता. सीमा भागात मराठीची होणारी अवहेलना लहानपणापासून पाहिली आहे. यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमा भागातील मराठी लढा यापुढेही सुरू ठेवणार असल्याचं लक्ष्मण पाटील यांनी सांगितलं.