गडचिरोली Tribal Person Killed by Naxalites : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका आदिवासीची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 29 मार्च) सकाळी घडली. अशोक लच्चा तलांडी (वय 39) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. (Naxalites in Gadchiroli) अहेरी तालुक्यातील बासगुडा या गावातील तो रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सदर घटना भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्र हद्दीतील ताडगाव परिसरात घडली आहे. या व्यक्तीचा भामरागड आलापल्ली मार्गावर मृतदेह पडला होता.
ताडगावजवळ मृतदेह आढळून आल्यानं खळबळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातलं होतं. गुरूवारीदेखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक चालली. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा गावातील रहिवासी असलेल्या अशोक तलांडी या आदिवासी व्यक्तीचा भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली.
हत्येमुळे परिसरात दहशतीचं वातावरण : मृतदेह शेजारी टाकलेल्या पत्रकात नक्षल्यांनी अशोक हा पोलीस खबऱ्या असल्यामुळे त्याची हत्या करीत असल्याचं म्हटलं आहे. माहिती मिळताच ताडगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. या हत्येमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता त्यांनी, मृत हा पोलीस खबऱ्या नसून चौकशीनंतर या प्रकरणाचा उलगडा होईल, असं स्पष्ट केलंय.
पत्रक आढळलं : मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांचं पत्रक आढळलं. त्यात अशोक हा पोलीस खबऱ्या असल्यामुळं त्याची हत्या करीत असल्याचं त्यात म्हटलं आहे. माहिती मिळताच ताडगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. या हत्येमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.