मुंबई -शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केलीय. "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दकी यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्दकी हे राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारच्या दृष्टीनं ती महत्त्वाची व्यक्ती होती. म्हणून त्यांच्यावर तिरंगा लपेटण्यात आला होता. बाबा सिद्दकी हे जनमानसातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं. अशा व्यक्तीची पोलीस बंदोबस्त असतानाही आणि तीन-तीन सिंघम या राज्याच्या मंत्रिमंडळात असताना त्यांची हत्या होते. या हत्येची जबाबदारी एका गॅंगनं घेतली आहे. पण त्यांच्या या हत्येला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी खोके जर कमी केले असते. थापेबाजी कमी केली असती, बोल बच्चनगिरी कमी केली असती, कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष दिलं असतं तर अशा घटना घडल्या नसत्या," असा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
लाचार आणि लोचट सरकार - पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही, राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे, बलात्कार अत्याचार हे दररोज घडताहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोज शेकडो निर्णय घेतले जाताहेत. जे निर्णय घेतले जाताहेत त्याच्यासाठी हे पैसे आणणार कुठून? आज राज्याची बाहेर चेष्टा केली जाते. केवळ निवडणुकीच्या धर्तीवर मोठमोठे निर्णय घेतले जाताहेत. यापूर्वी दहा हजार वर्षात असे सरकार झाले नव्हते. एवढे हे XXX सरकार आहे. यांना राज्यातील सुरक्षा, गुन्हेगारी याबाबत काही नाही. हे सत्तेसाठी मोठमोठे निर्णय घेताहेत. दहा हजार वर्षात एवढे नालायक, लाचार आणि लोचट सरकार झाले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गृहमंत्री हे महाराष्ट्राला लाज आणण्यासारखे आहे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केली.
आता गोळ्या घाला - बदलापूर घटनेत आरोपीला गोळ्या घातल्या, आता बिश्नोई गँगला पकडून त्यांना गोळ्या घाला. आपल्या एका सहकाऱ्याची हत्या होते. तुम्ही म्हणता आरोपी पकडले. पण काय खरं-खोटं बाहेर येईल. शिंदेंच म्हणाले होते ना की, मुंबईमध्ये गँग चालू देणार नाही. गुंडांची दहशत चालणार नाही. मी बघून घेईन. आता घ्या बघून. गुजरातमध्ये एटीएसचा ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते. ती व्यक्ती मुंबईतील हत्येची सूत्रधार आहे. गुजरातमध्ये बसून मुंबईत उद्योगधंदे पळवायचे, मुंबईतील मराठी माणसाला त्रास द्यायचा, आमच्या मुंबईतल्या माणसांची हत्या करायची हे सगळं गुजरातमधून होत आहे. तुमच्या गुजरातमधील तुरुंगातला गॅंगस्टर आमच्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्याची हत्या करतो. तरी तुम्ही ती थांबवू किंवा रोखू शकत नाही. खरं तर हे प्रकरण एवढ मोठं आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली.