महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी बाळांचा जन्म; राम, सिता नावावरुन नामकरण - प्रभु श्रीराम

Ram Mandir Pran Pratishtha Day : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच नाशिकमध्ये 78 महिलांनी गोंडस बाळाला जन्म दिलाय. यामध्ये 46 मुलांसह 32 मुलींचा जन्म झालाय. त्यामुळं प्रभू श्रीराम, सीता यांच्या नावावरून या बाळांचं नामकरण करण्यात आलंय.

Ram Mandir Pran Pratishtha
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 8:50 PM IST

Updated : Jan 23, 2024, 9:22 PM IST

डॉ. मीनल रणदिवे माहिती देताना

नाशिक Ram Mandir Pran Pratishtha Day : उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारी रोजी भव्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यामुळं देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच नाशिकमधील काही गर्भवती महिलांनी प्रसूतीसाठी डॉक्टरांकडं आग्रह धरला होता. 22 जानेवारीला बाळाचा जन्म व्हावा, अशी इच्छा या महिलांनी व्यक्त केली होती. 22 जानेवारी हा शुभ दिवस आहे, त्यामुळं याच दिवशी बाळाचा जन्म व्हावा, असं 78 गर्भवती महिलांचं म्हणण होतं.

78 महिलांची प्रसूती सुखरूप : नाशिक शहरातील सरकारी तथा खासगी रुग्णालयात 78 महिलांची सुखरूप प्रसूती झाली. यामध्ये 46 मुलांसह 32 मुलींचा जन्म झाला. यातील 38 पालकांनी आपल्या मुलाचं नामकरण राम, तर आठ पालकांनी त्यांच्या मुलीचं नाव सीता, सिया असं ठेवलं आहे. सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात जल्लोष पहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळं नाशिकमधील काही पालकांनी अयोध्येतील उत्सवादरम्यान स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधून प्रसूतीची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळं स्त्रीरोगतज्ज्ञांनी ज्या महिलांचे औषधोपचार पुर्ण झाले आहे, त्यांच्या प्रसूतीला होकार दिला. त्यात शहरातील अशोक स्तंभ येथील सुजाता नर्सिंग होममध्ये पाच मातांची प्रसुती करण्यात आली. तसंच सिडको परिसरातील सेडर्स हॉस्पिटलमध्ये तीन, डॉ. संगीता वाघ यांच्याकडं तीन मातांची यशस्वी प्रसुती झाली.

श्रीराम, सीता यांच्या नावावरुन नामकरण : याव्यतिरिक्त सातपूर, पंचवटी, गंगापूररोड, नाशिकरोड परिसरात 50 हून अधिक मातांची प्रसूती झाली. त्यात जवळपास 38 पालकांनी आपल्या बाळाचं नाव श्रीराम यांच्या नावावर ठेवलं आहे. तर, काही पालकांनी मुलींचं नाव सीता, सिया असं ठेवलं आहे. तसंच उर्वरित कुटुंबांनी घरी गेल्यावर नामकरण विधी करणार असल्याचं सांगितलं.

100 हून अधिक महिलांची प्रसुतीसाठी चौकशी : नाशिक गायनॅकॉलॉजिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गौरी करंदीकर यांनी सांगितलं की, 'राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त 100 हून अधिक जोडप्यांनी प्रसुतीबाबत चौकशी केली होती. ज्यात नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती महिलांचा समावेश होता. तसंच ज्या महिलांना सिझेरियन करावं लागणार होतं, अशाच महिलांची प्रसूती करण्यात आली.'

आयुष्यभर लक्षात राहणारा दिवस : माझ्या पत्नीला नऊ महिने पूर्ण झाले होते. वैद्यकीयदृष्ट्या डॉक्टरांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की, तिचं सिझेरियन होणार आहे. त्यामुळं आम्ही त्यांना 22 जानेवारीला प्रसूती करण्याची विनंती केली होती. त्यांनी सर्व वैद्यकीय चाचण्या करून आम्हाला होकार दिला. त्यामुळं माझ्या पत्नीनं 22 जानेवारीला एका गोंडस मुलाला जन्म दिला. संध्याकाळी आम्ही त्याचं नाव राम ठेवलंय, असं एका वडिलांनी सांगितलं. हा दिवस आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी संस्मरणीय राहणार असल्याचं देखील ते म्हणाले.

आम्ही देखील आनंद उत्सव साजरा केला : रविवारी 21 तारखेला एक महिला सिझेरियनसाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. तिनं आम्हाला अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रसूती करण्याची विनंती केली होती. आम्ही महिलेची विनंती मान्य करत 22 तारखेला सकाळी त्या महिलेची प्रसुती केली. देश जल्लोष करत असताना, आम्हीही आमच्या रुग्णालयात आनंदोत्सव साजरा केला, असं स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मीनल रणदिवे यांनी म्हटलंय.


हे वाचलंत का :

  1. सोलापूरच्या चित्रकाराची अनोखी रामभक्ती; रक्ताने साकारली प्रभू श्री रामांची प्रतिमा
  2. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची केली आतिषबाजी
  3. अयोध्येपासून अमेरिकेपर्यंत 'जय श्रीराम'! भारतीयांकडून जगभरात 'असे' कार्यक्रम होणार साजरे
Last Updated : Jan 23, 2024, 9:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details