दौंड : येथील पोलिसांनी सापळा रचत वाहतूक करणारा ट्रक पकडून सुमारे 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (16 डिसेंबर) रोजी अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई केल्याची माहिती माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली. या कारवाईमुळं अवैध गुटखा रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोत्यांमध्ये आढळला गुटखा :याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड-कुरकुंभ महामार्गावर एका ट्रकमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती एका व्यक्तीनं दौंड पोलिसांना फोन करून दिली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस कॉन्स्टेबल पवन माने, कुलकर्णी, फडणीस यांनी दौंड शहरातील गोल राऊंड येथे एक अशोक लेलँड कंपनीचा सहा टायर ट्रक (क्रमांक - केए 19 ए 2588) पकडला. यावेळी पोलिसांनी ट्रकमधील मालाची पाहणी केली असता पोत्यांमध्ये गुटखा भरलेला आढळून आला.
अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई (Source - ETV Bharat Reporter) एवढा मुद्देमाल जप्त :64 लाख 99 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त : पोलिसांना 141 पिशव्यांमध्ये विविध प्रकारचे सुगंधित पान मसाला असल्याचं आढळून आलं, ज्यावर सरकारनं बंदी घातली आहे. या कारवाईत दौंड पोलिसांनी 54 लाख 99 हजार 800 रुपये किमतीचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 64 लाख 99 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, रुपेश कदम, पोलीस हवालदार एस. डी. राऊत, नितीन बोराडे, निखिल जाधव, महेश भोसले, संजय कोठावळे, पवन माने, एच. एस. कुलकर्णी, रमेश करचे, नितीन दोडमिसे यांसह पोलीस पथकानं केली आहे.
गुटखा विक्रीला आळा बसेल : दौंड तालुक्यात तसंच परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री ही सुरू असते. तसंच किराणा मालाच्या दुकानातूनही गुटखा विक्री सुरू असल्याचं अनेक ठिकाणी आढळून आलं आहे. दौंड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळं गुटखा विक्रीवर आळा बसेल, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत. या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे.
हेही वाचा
- परभणी युवक मृत्यू प्रकरण: प्रकाश आंबेडकरांनी तरुणाचा शवविच्छेदन अहवाल आणला समोर
- दादा, साहेब की अध्यक्ष; कोण होणार कोल्हापूरचे पालकमंत्री?
- बेस्टच्या ताफ्यात लवकरच नवीन १३०० बसेस येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती