पुणे Illegal School : विद्येचं माहेरघर तसंच शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 49 शाळा इंग्लिश माध्यमांच्या असून पुणे शहर आणि ग्रामीण भागतील 45 शाळा या बेकायदेशीर आहेत तर 4 शाळा या नियमबाह्य पद्धतीनं चालत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या शाळांवर कारवाई करत त्या शाळांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसंच या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत ट्रान्स्फर केलं जाणार असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
एक लाख दंड : यासंदर्भात बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले, "पुणे शहर तसंच जिल्ह्यातील 49 अनधिकृत शाळा या इंग्लिश माध्यमांच्या आहेत. तसंच जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील सर्व शाळांचं सर्वेक्षण केल जातं असून ज्या शाळांना मान्यता नाही त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येत आहे. तसंच पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून 45 शाळा या बेकायदेशीर आहेत तर 4 शाळा नियमबाह्य आहेत. ज्या शाळांना नोटीस बजावण्यात आल्या, त्यांनी जर नोटीस बजावून देखील शाळा सुरू ठेवल्या तर शाळेला प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यानंतर जर शाळा सुरू राहिली तर प्रतिदिन 10 हजार रुपये असा दंड केला जाणार आहे. एवढंच नव्हे जर कारवाई करुन सुद्धा शाळा बंद केल्या नाहीत तर फौजदारी गुन्हा देखील दाखल होणार आहे."