मुंबई : महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला राज्यभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं अनेक योजना आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर वरळीतील बीडीडी चाळीतील 450 पोलीस पत्नींच्या घरासाठी लवकरच लॉटरी निघणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री शिंदे सरकारकडून पोलिसांच्या पत्नीच्या घरांसाठी आणखी एक गिफ्ट लवकरच मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं पोलीस पत्नींनी समाधान व्यक्त केलं.
लॉटरी कधी निघणार? : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळीतील साडेचारशे पोलीस पत्नींच्या घराचा प्रश्न मागील दीड वर्षापासून प्रलंबित होता. मात्र, आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या घरासाठी सोमवारी (14 ऑक्टोबर) रोजी लॉटरी काढण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या पोलीस पत्नींना घरं मिळवून देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. यानंतर या पोलीस पत्नींनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा निवासस्थानी' जात खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. वरळी येथे पोलिसांची कॉटर्स आहेत. मात्र, अन्य ठिकाणी पोलिसांना घरं न देता वरळीतील बीडीडी चाळीतच पोलीस पत्नींना घरं मिळावीत, असं पोलीस पत्नींचं म्हणणं होतं. मात्र दीड वर्षापासून रखडलेला प्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं मार्गी लागला आहे. या विभागात शिवसेना (ठाकरे गटाचे) 3 आमदार असूनही हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गटाच्या) आमदारांवर केली.