कोल्हापूर Accident On Nipani Devgad Highway : भरधाव ट्रकची बोलेरो गाडीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना निपाणी-देवगड राज्यमार्गावर मंगळवारी मध्यरात्री घडली. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकूर इथल्या तीन तरुणांचा मृत्यू झाला. शुभम चावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावं आहेत. ऐन गणेशोत्सवात तीन तरुणांचा मृत्यू झाल्यानं सोळांकूर गावावर शोककळा पसरली आहे. बेदरकारपणे ट्रक चालवून तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कर्नाटकमधील यादगीर इथला ट्रकचालक गड्याप्पा परशुराम राठोड याच्यावर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
मंगळवारी मध्यरात्री निपाणी-देवगड राज्यमार्गावरील सोळांकूर- मांगेवाडी गावच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. - संतोष गोरे, पोलीस निरीक्षक, राधानगरी
भरधाव ट्रक आणि बोलेरोच्या अपघातात तीन तरुण ठार :कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील सोळांकूर-मांगेवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री निपाणी देवगड राज्य मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात सोळांकूर गावच्या तीन तरुणांचा मृत्यू झाला असून अन्य चौघं गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शुभम चावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार या ऐन विशीतील तरुणांचा समावेश आहे. या घटनेत ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली, संभाजी लोहार हे चौघं गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.