मुंबईHigh Tech Grampanchayat Facility:लोकसभा निवडणुकांच्या नंतर आता राज्य सरकारने राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा आणि जनतेला त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा आगामी निवडणुकांपूर्वी राज्य सरकारचा मानस आहे. या दृष्टीने केंद्र सरकारने देशभरात राबवलेली ऑप्टिकल फायबर योजना राज्य सरकारने अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी दिली आहे.
काय आहे योजना :केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीनं राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व ग्रामपंचायती या इंटरनेटद्वारे सक्षम केल्या जाणार आहेत. ऑप्टिकल फायबरद्वारे पुरवण्यात आलेल्या जाळ्याद्वारे दहा एमबीपीएस पर्यंत स्पीड असलेली इंटरनेट सेवा या ग्रामपंचायती, अंगणवाड्या, पोलीस स्टेशन, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याद्वारे या ठिकाणचा कारभार अधिक वेगवान आणि इंटरनेट सेवा अधिक दर्जेदारपणे वापरता यावी यासाठी करण्यात येणार आहे. सुमारे 5000 कोटी रुपयांच्या या योजनेला 2016 मध्ये सुरुवात झाली. यापैकी तीन हजार कोटी रुपये केंद्र सरकार आणि दोन हजार कोटी रुपये राज्य सरकारच्यावतीनं खर्च करण्यात येत आहेत.
किती ग्रामपंचायतींमध्ये काम सुरू :राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने राज्यातील सुमारे 12500 ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर लावण्यात येत आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे साडेअकरा हजार गावे ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आली असल्याचं पराग जैन यांनी सांगितलं. तर बीएसएनएलच्या माध्यमातून उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर टाकण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 15000 गावांमध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली आहे.