महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार 25 लाखांची मदत; जाणून घ्या नियम व अटी - LEOPARD ATTACK FINANCIAL ASSISTANCE

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणाऱया मदतीची रक्कम आता वाढवली आहे. याबाबत जीआर काढण्यात आला आहे.

leopard
बिबट्या (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 9:34 PM IST

नाशिक : शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा वावर सर्वाधिक आहे. शहरी भागातील लोकवस्तीपासून ते ग्रामीण भागातील वाड्या, वस्तीपर्यंत बिबट्याचा वावर आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाकडून पिंजरे लावून बिबटे जेरबंद केले जातात. दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकदा बिबटे अन्न पाण्याच्या शोधत मानवी वस्तीकडे येत असतात. अनेकदा बिबट्या आणि मानवाचा संघर्ष बघायला मिळतो. बिबट्यांनी केलेल्या हल्लयात अनेकवेळा नागरिकांचा मृत्यू झाला, तर कधी जखमी देखील झाले आहेत.

यापूर्वी वन्यप्राण्याच्या (बिबट्या) मानवी हल्ल्यात दिली जाणारी आर्थिक मदतीची रक्कम कमी होती. यंदा यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मानवाचा मृत्यू झाल्यास वारसदाराला वीस लाख रुपये दिले जात होते. अपंगत्व आल्यास पाच लाखांची तर गंभीर जखमी झाल्यास केवळ एक लाख पंचवीस हजारांची मदत दिली जात होती. आता यामध्ये शासनाकडून वाढ करण्यात आली असून, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पंचवीस लाख, जायबंदी झाल्यास साडेसात लाख तर गंभीर जखमी झाल्यास पाच लाखांची मदत दिली जाणार आहे. मनुष्यहानी किंवा पशुहानी झाल्यास त्याची माहिती 48 तासात वन विभागाला किंवा पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे. ही सर्व माहिती जीआरमध्ये नमूद आहे.

वन्यप्राणी नेमके कोणते? : बिबट्या, वाघ, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्ह, माकड, निलगाय, खोकड यांच्याकडून मानवी हल्ला झाल्यास आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. तसेच पशुधनाचीही हानी झाल्यास देखील नुकसान भरपाई दिली जाते.

किरकोळ जखमीस 50 हजार रुपये : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च दिला जातो. मात्र, खासगी रुग्णालयात औषध उपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा 50 हजारपर्यंत प्रतिव्यक्ती असल्याचं शासन आदेशात म्हटले आहे. शक्यतो औषध उपचार शासकीय जिल्हा रुग्णालयात अथवा शासकीय ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 300 हून अधिक बिबटे : नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं, मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांचा वावर आता नित्याचा झाला आहे. त्यामुळे मानव आणि बिबट्यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात नेमकी बिबट्यांची संख्या किती? याबाबत वन विभागाकडे अचूक माहिती नसली तरी, 100 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाच बिबट्या आणि पाच तरस राहत असल्याचं एका संशोधनातून सांगितलं जातं. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात 300 हून अधिक बिबटे असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 1883 चं नाशिकचं गॅझेटिअर पाहिलं की लक्षात येतं की, त्यावेळीही बिबट्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी होती. तसंच गाव परिसरात ये-जा करणाऱ्या बिबट्यांची संख्या पूर्वीपासूनच आहे.

बिबट्या लाजाळू आणि घाबरट प्राणी : विचार केला तर बिबट्या हा अत्यंत लाजाळू आणि घाबरट प्राणी आहे. नाशिक जिल्ह्यातील दाट असलेले वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच प्रत्येक बिबट्याला त्याचा स्वतंत्र अधिवास आवश्यक असतो. हा अधिवास मिळत नसल्यानेच बिबट्या मानवी वस्तीकडे येतो. त्यातच गाव, शहर परिसरात अस्वच्छतेवर कुत्रे, मांजरी, डुकरे हे प्राणी आपली गुजराण करतात. त्यामुळे गावाकडे आलेल्या बिबट्याला कुत्रं, मांजर आणि डुकरांसारखे प्राणी भक्ष्य म्हणून मिळतात. त्यामुळे बिबट्यांचे गाव, शहराकडे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असं प्राणीमित्र सांगतात.

80 टक्के शुगर केन लेपर्ड : नाशिक हा सदन जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष पाठोपाठ उसाचे क्षेत्रफळ मोठे आहे. तसेच गोदावरी, दारणासारख्या नद्या असल्याने या नदीच्या काठाला असलेल्या उसाच्या शेतात बिबट्याला सुरक्षित वाटते. याठिकाणी मादी बछड्यानं जन्म देते, वर्षभरहून अधिक काळ बिबट्याचे वास्तव्य इथे असते. तसेच उसाच्या बाहेर पडताच त्यांना भक्ष म्हणून कुत्रे, वासरू, मांजरी, डुकरे सहज उपलब्ध होत असल्याने बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे प्राणीमित्र सांगतात. वनविभागाच्या एका सर्वनुसार 80 टक्के शुगर केन लेपर्ड नाशिक जिल्ह्यात आहेत.

बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून, या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

अशी घ्यावी काळजी : नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी ही चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचं दिसून आलं आहे. अशात शेतकऱ्यांनी, मजुरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस हे वनप्राणी जवळ येणार नाही. अनेकवेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचं दिसून आलं आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन वन विभागाने केलं आहे.

हेही वाचा -

  1. शेंडीतला नर बिबट्या अखेर जेरबंद, वनविभागाच्या पिंजऱ्यात जनावर अलगद अडकलं, मादीलाही लवकरच पकडणार
  2. कोल्हापुरात बिबट्या आल्याचा गैरसमज आणि वनविभागाची तारांबळ, गुरगुरणारा निघाला कुत्रा - Leopard in Kolhapur
  3. बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; गावावर शोककळा, ग्रामस्थ संतापले - Leopard Attack On Child

ABOUT THE AUTHOR

...view details