पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या तसंच पाळीव कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या भटक्या, पाळीव कुत्र्यांमुळं पुणेकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरात वर्षभरात सुमारे 18 हजार नागरिकांचा या कुत्र्यांनी चावा घेतल्याचं समोर आलं आहे. कुत्रा चावल्यानं शहरातील विविध दवाखान्यात शहरातील तसंच शहराच्या बाहेरील नागरिक देखील येत असल्यानं या सगळ्या घटना शहरातील नव्हे, तर काही ग्रामीण भागातील देखील असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी दिली.
कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम : डॉ. निना बोराडे म्हणाल्या, "पुणे महापालिकेच्या हद्दीतील कुत्र्यांची संख्या पाहिल्यास पाळीव कुत्र्यांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे, तर भटक्या कुत्र्यांची संख्या दोन ते सव्वा दोन लाखाच्या आसपास आहे. या सर्व कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून 7 ठिकाणी कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण तसंच ट्रीटमेंट केली जातेय. या 7 ठिकाणी चालू वर्षात जवळपास 57 हजार 494 कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. एप्रिलपासून विचार केला तर 37 हजार 495 नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर वर्षभरात 1 लाख 18 हजार 719 कुत्र्यांचं आणि मांजरींचं लसीकरण करण्यात आलं आहे."
एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी 1 हजार 600 रुपये : "वर्षभरात महापालिकेनं केलेल्या नसबंदी आणि लसीकरणासाठी जवळपास 6 कोटीहून अधिक खर्च झाला आहे. एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी महापालिका 1 हजार 600 रुपये खर्च करत असते. तसंच आत्ता महापालिकेत नव्यानं 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं शहरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेत जवळपास दररोज 25 ते 30 तक्रारी कुत्र्यांच्या संदर्भात येत असतात," असं देखील डॉ. बोराडे यांनी सांगितलं.