छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)16 Year Boy Suicide : छत्रपती संभाजीनगरमधील करमाड परिसरात १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी करमाड पोलीस ठाण्यात ठिय्या दिला असून, मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. करण भाऊसाहेब पोफळे असं या मुलाचं नाव असून, तो गेले तीन दिवस बेपत्ता होता. शेतात त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जालना रस्त्यावर आंदोलन केलं. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास मृत मुलाच्या वडिलांनी नकार दिल्यावर पोलिसांनी मध्यस्ती करून समजूत काढली. मात्र दोषींवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
पोलीस अन् शिक्षकानं मारहाण केल्याचा आरोप :१६ वर्षीय शाळकरी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी करमाड पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीत मुलाचं अपहरण झाल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ही घटना शुक्रवारी (ता.२७) उघडकीस आली. आपल्या मुलाला एक पोलीस अधिकारी आणि शाळेतील शिक्षकाने शाळेत मारहाण केली. त्याचा अपमान सहन न झाल्यानच त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केलाय. घटनेनंतर नातेवाईकांनी जालना मार्गावर जवळपास एक तास रास्ता रोको करत मृत मुलाच्या मृतदेहाची ॲम्ब्युलन्स पोलीस ठाण्यात नेली. पोलीस उपविभागीय अधिकारी विष्णू भोये यांनी चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी मृतदेह हिवरा गावी नेऊन रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
शेतात गेला अन् परत आलाच नाही :करण याचे वडील भाऊसाहेब रंगनाथ पोफळे यांनी करमाड पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, ते २३ सप्टेंबर रोजी पत्नीसोबत करमाड येथे बाजारासाठी गेले होते. ते दोघे चार वाजता आपल्या हिवरा गावातील घरी आले. यावेळी त्यांचा मुलगा करण हा शाळेतून घरी आला होता. जेवण केल्यानंतर सायंकाळी गायीसाठी गवत आणण्यासाठी तो शेतात गेला होता, परंतु बराच वेळ होऊनही तो घरी आलाच नाही. त्याचा शेतशिवारात, आजूबाजूच्या गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु तो सापडलाच नाही. त्यानंतर आपल्या मुलाचं कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं असता शुक्रवारी शेतातील झाडावर त्याचा मृतदेह आढळून आला.
मुलाचे वडील अल्पभूधारक शेतकरी :करणचे वडील भाऊसाहेब रंगनाथ पोफळे हे हिवरा येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्याची आई भाजीपाला विकून शेतीकामं करते. करण हा एकुलता एक मुलगा होता, त्याच्या आत्महत्येनं त्यांनी एकुलता एक आधार गमावला आहे. याबाबत करमाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाही. पालकांनी केलेल्या आरोपांनंतर जालना मार्गावर अचानक हजारो लोकांचा जनसमुदाय जमा झाल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस उपविभागीय अधिकारी विष्णू भोये यांनी नातेवाईकांची समजूत काढून यात दोषी असणाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- जिल्हा परिषद शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा - Biscuits poisoned students
- नामांकित कंपनीच्या बेबीफूडमध्ये आढळल्या अळ्या; बाळाला विषबाधा - Larvae Found In Baby Food