मुंबई - सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुरुवातील विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन करत ईव्हीएम आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले. यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या अपघातात सात लोकांचे बळी गेले. ही घटना ताजी असताना आता मुंबईतील बेस्टमधील अनेक बसेस ह्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळं आगामी काळात १३०० बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याची ऑर्डर काढली असून लवकरच बेस्टच्या ताफ्यात या बसेस दाखल होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
आयुर्मान संपलेल्या बसेसमुळं अपघात - गेल्या काही वर्षापासून मुंबईत बेस्ट बसेसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत कुर्ला, सीएसएमटी आणि गोवंडीत बेस्ट बसचा अपघात झाला. कुर्ला येथील घटनेत ७ जण दगावले. तर ४२ जण जखमी झाले. गेल्या वर्षभरात बेस्टचे ३४७ अपघात झाले. अनेक निष्पापांचा यात बळी गेला. आयुर्मान संपलेल्या गाड्या रस्त्यावर आल्याने अपघात वाढत आहेत. परिणामी मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे. शासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी. आयुर्मान संपलेल्या बस गाड्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी अशा स्वरूपाचे शिवसेना (ठाकरे) आमदार सुनील शिंदे यांनी सभागृहात मुंबईतील बेस्ट बस अपघात प्रकरणी २८९ अंतर्गत स्थगन प्रस्ताव मांडला. यानंतर सभागृहात चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.