पुणे Boy Dies Ball Hits Genitals : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्यानं चिमुरड्याचा मृत्यू झालाय. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे असं मृत्यू झालेल्या ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. ही घटना गुरुवारी लोहगाव भागात घडली.
बॉल लागून झाला मृत्यू : शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळं शंभू हा गुरुवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. शंभूला खेळताना अचानक समोरून येणारा बॉल गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला. शंभू याला बॉल लागताच त्याचे मित्र हे त्याच्याकडं धावून गेले. बॉल लागल्यावर शंभू हा काही वेळ उठून उभा राहिला होता. मात्र, त्रास खूपच झाल्यानं तो परत मैदानावर पडला.
तपासून डॉक्टरांनी केलं मृत घोषित : शंभू खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला आणि तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शंभू याची तपासणी केल्यानंतर त्याला लगेच मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेळताना काळजी घ्या : सध्या मोबाईलच्या काळात मैदानी खेळाकडं लहान मुलांचं लक्ष कमी झालंय. मात्र, तरीही काही मैदानी खेल आजही लहान मुलं आवडीनं खेळतात. मात्र, मैदानी खेळ खेळताना सर्वांनीच आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन करण्यात येतंय. क्रिकेट खेळताना पॅड, ग्लोज, हेल्मेट अशा सुरक्षेच्या गोष्टी वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा -२६/११ संदर्भात विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य निराधार, उज्ज्वल निकम यांचा दावा, 'गोबेल्स प्रचार' असल्याचा केला आरोप - Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar