ठाणे Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी विवाहितेच्या असहायतेचा फायदा घेत, चहामधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Raped) करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही खळबळ उडवून देणारी घटना समोर आली.
दोघांनी केला सामूहिक बलात्कार : ठाण्यात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला बहाण्याने रिक्षात घेऊन जात तिच्यावर १७ वर्षीय अल्पवयीन असलेल्या दोघांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात (Ambernath Police Station) भारतीय न्याय संहिता यातील नवीन कलमासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करत दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं.
पीडित मुलगी मागत होती भिक्षा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही उदरर्निवाहासाठी अंबरनाथ भागातील एका मंदिराबाहेर तिच्या आजीसह भिक्षा मागत असते, तर अल्पवयीन आरोपी हे अंबरनाथ पश्चिम भागातील राहणारे आहेत. शुक्रवारी घटनेच्या दिवशी अल्पवयीन आरोपीही याच मंदिराबाहेरच्या दिशेने एका रिक्षातून सायंकाळच्या सुमारास जात असताना, त्यांची नजर या अल्पवयीन पीडित मुलीवर पडली होती. त्यावेळी ती पीडित मुलगी एकटीच अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या दिशेहून कल्याणकडे जाणाऱ्या रस्तावरुन जात होती.
आळीपाळीनं केला अत्याचार : याच संधीचा फायदा घेऊन रिक्षात बसलेल्या अल्पवयीन आरोपीने तिच्याजवळ रिक्षा थांबवली. "आम्ही तुझ्या वडिलांना ओळखतो, चल तुला घरी सोडतो" असे बोलून थाप मारली. याच भुलथापाला पीडित अल्पवयीन मुलगी बळी पडली आणि त्यांच्यासोबत रिक्षात बसली. नंतर रिक्षा निर्जनस्थळ घेऊन गेले. या ठिकाणी गेल्यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपींनी रिक्षा चालकाला धमकी देऊन पळवून लावले. त्यानंतर पीडित मुलीलाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
बाल सुधारगृहात रवानगी : पीडित मुलगी रात्री घरी आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध सुरु केला. रात्री मुलगी त्यांना अंबरनाथ भागात आढळून आली. त्यावेळी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता हा धक्कादायक प्रसंग समोर आला. तिच्या घरच्यांनी शनिवारी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता यातील नवीन कलमासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास जलदगतीनं सुरू केला. ज्या मार्गावरुन रिक्षा नेली त्या मार्गातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर काही तासातच आरोपीना भेंडीपाडा भागातून ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली. रविवारी (सुट्टीच्या विशेष बाल न्यायालयात) दोन्ही आरोपीना हजर केलं असता त्यांची रवानगी भिवंडीतील बाल सुधारगृहात करण्यात आली. तर या घटनेचा अधिक तपास पोलीस पथक करत आहेत.
हेही वाचा -
- अंधाराचा फायदा घेत आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- मंदिराच्या पुजाऱ्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या; तिघांना अटक - gang rape
- कामाचे आमीष दाखवून गुजरामध्ये विक्री, बळजबरीने लग्न अन् सामूहिक बलात्कार; तीन लेकरांच्या आईची करुण कथा