चालकाचं नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 1 ठार, 8 गंभीर - JEEP FALLS INTO RAVINE
शहापुरातील विहीगाव खोडाळा गावाच्या हद्दीतील अप्पर वैतरणा धरणाच्या लगत असलेल्या दरीत गाडी कोसळलीय. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केलाय.
Published : Jan 7, 2025, 7:59 PM IST
ठाणे-प्रवासी वाहन असलेल्या जीपवरून चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी 200 फूट दरीत कोसळलीय. या झालेल्या भीषण अपघातात 1 प्रवासी ठार झाला असून, 8 जण गंभीर जखमी आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आलंय. शहापूर तालुक्यातील पालघर मार्गावरील असलेल्या विहीगाव खोडाळा गावाच्या हद्दीतील अप्पर वैतरणा धरणाच्या लगत असलेल्या दरीत गाडी कोसळलीय. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केलाय. दादू जेठू झुगरे ( वय 69, रा. माळ गावठा, शहापूर तालुका ) असे अपघातात ठार झालेल्या प्रवाशाचं नाव आहे.
वळणादार रस्त्यावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले :मिळालेल्या माहितीनुसार, मृत दादू जेठू झुगरे हे रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते. ते कुटुंबासह शहापूर तालुक्यातील कसारा भागात असलेल्या माळ गावठा येथे राहत होते. मृत दादू हे आज 7 जानेवारीला सकाळच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील खोड गावात आपल्या मूळ गावी कुटुंबासह प्रवासी जीपने निघाले असतानाच कसारा भागातील विहिगावाजवळील वळणादार रस्त्यावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट 200 फूट खोल दरीत कोसळले.
खडकावर जाऊन प्रवासी वाहन आदळले :खळबळजनक बाब म्हणजे अपघाताच्या स्थळावर खालच्या बाजूला अप्पर वैतरणा धरणाच्या काठावर असलेल्या खडकावर जाऊन प्रवासी वाहन आदळले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने जखमींना सुरुवातीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, मात्र जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यासह इतर 2 जणांवर खर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झुगरे कुटुंबातील 7 जण जखमी :दरम्यान, चालक सुरेश ठोंबरे यांच्यासह झुगरे कुटुंबातील 7 जण जखमी झालेत. त्यामध्ये सन्या ठाकरे, भारती झुगरे, उषा झुगरे, अती झुगरे, अंकिता झुगरे, आदित्य झुगरे, पातळी झुगरे अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, नायब तहसीलदार वसंत चौधरी, पोलीस निरीक्षक सुरेश गावित, पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी तसेच घटनस्थळाचा पंचनामा करीत पोलीस तपास सुरू केलाय.
हेही वाचा -