हरारे ZIM vs AFG 1st T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला T20 सामना आज 11 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे.
पाकिस्तानकडून झिम्बाब्वेचा पराभव :झिम्बाब्वे संघानं नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 नं गमावली. त्यामुळं या मालिकेत यजमान संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. अफगाणिस्तान सध्या ICC पुरुषांच्या T20 संघ क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा T20 मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे.
T20 विश्वचषकानंतर पहिलाच T20 सामना : दुसरीकडे या मालिकेत अफगाणिस्तानची कमान राशिद खान सांभाळणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या ACC पुरुष T20 इमर्जिंग आशिया कप 2024 च्या विजेतेपदासाठी अफगाणिस्तानचं नेतृत्व केल्यानंतर युवा फलंदाज अष्टपैलू झुबैद अकबरीचा प्रथमच T20 संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकीपटू मुजीब उर रहमानचा उजव्या पायाच्या दुखण्यातून बरा झाल्यानंतर T20 संघात समावेश करण्यात आला आहे. जुनमध्ये T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर अफगाणिस्तान पहिलीच T20 मालिका खेळणार आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : T20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्ताननं 15 पैकी 14 T20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं फक्त 1 सामना जिंकला आहे. यावरुन अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं.
खेळपट्टी कशी असेल : हरारे स्पोर्ट्स क्लबमधील खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक असेल आणि फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त ठरेल. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना नव्या चेंडूची थोडीफार मदत मिळू शकते. पण जसजसा खेळ पुढं जाईल तसतशी फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. या मैदानावर दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथील T20 सामन्यांची आकडेवारी कशी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आतापर्यंत एकूण 46 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 23 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 21 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.