बंगळूरु WPL MIW vs UPW : यंदाच्या महिला आयपीएलमधील सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या संघात बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात युपी वॉरियर्सनं गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सनं दारुण पराभव केलाय. विशेष म्हणजे सोलापूरच्या किरण नवगिरेनं युपी वॉरियर्सकडून खेळताना केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळं मुंबईचा पराभव झाला. युपी वॉरियर्सचा या हंगामातील पहिलाच विजय आहे. किरणनं 31 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. तिच्या या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तिनं या खेळी दरम्यान चौकार आणि षटकारांच्या मदतीनं अवघ्या 10 चेंडूत 48 धावा कुटल्या. यंदाच्या हंगामात यूपीला दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र किरणच्या खेळीमुळं मुंबईविरुद्ध युपीनं विजयाचं खातं उघडलंय.
किरण नवगिरेची चौफेर फटकेबाजी : युपी वॉरियर्सकडून सलामीला येत सोलापूरच्या किरणनं मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. तिनं मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धूतलं. यासह आयपीएलमध्ये तिनं पहिलं अर्धशतकही केलं. किरण नवगिरेनं 31 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी करत 57 धावांची खेळी केली. कर्णधार एलिसा हिली हिच्यासोबत तिनं पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे किरणनं 57 धावांपैकी 48 धावा या चौकार आणि षटकारांच्या जोरावर केल्या.