बेंगळुरु WPL MI vs DC : महिला प्रीमियर लीग 2024 चा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरु इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर खेळला गेला. या वर्षीचा हा पहिलाच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवर मुंबईला विजयासाठी 5 धावांची गरज होती. तेव्हा एस सजनानं अप्रतिम षटकार ठोकला आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं हा रोमांचक सामना 4 विकेटनं जिंकला. तिचा हा षटकार पाहून सगळेच थक्क झाले. या रोमांचक सामन्यात मुंबईकडून यास्तिका भाटिया आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी दमदार खेळी केली. दोघांमध्ये 56 धावांची भागीदारी झाली. यास्तिकानं 57 धावांची स्फोटक खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढलं. तर कर्णधार हरमनप्रीतनं 55 धावा केल्या. मात्र, अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एलिस कॅप्सीनं तिला बाद केलं. ज्या वेळी हरमन बाद झाली, तेव्हा मुंबईला एका चेंडूवर 5 धावा हव्या होत्या, तेव्हा सजना सजनानं पहिल्याच सामन्यात सामना जिंकणारा षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
दिल्लीची दमदार फलंदाजी :या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं मुंबईविरुद्ध निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा केल्या. दिल्लीकडून एलिस कॅप्सीनं 75 धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान तिनं 141.50 च्या स्ट्राईक रेटनं आठ चौकार आणि तीन षटकार मारले. तर जेमिमा रॉड्रिग्जनंही 42 धावा केल्या. मात्र, तिला या खेळीचं अर्धशतकात रुपांतर करता आलं नाही. कर्णधार मेग लॅनिंगनंही 31 धावा केल्या. दिल्लीविरुद्ध मुंबईकडून नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केरनं प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय शबनिम इस्माईलला एक बळी घेण्यात यश मिळालं.