नवी दिल्ली WPL 2024 Final : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंळुरू (RCB) महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 चं विजेतेपद उत्कृष्ट कामगिरीसह पटकावलं. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 8 गडी राखून पराभव करुन विजेतेपद पटकावलं.
दिल्ली सलग दुसऱ्यांदा उपविजेता : या सामन्यात आरसीबीसमोर 114 धावांचं लक्ष्य होते. ते संघानं केवळ 2 गडी गमावून 19.3 षटकांत पूर्ण केलं. संघाकडून एलिस पेरीनं नाबाद 35, सोफी डिव्हाईननं 32 आणि स्मृती मानधनानं 31 धावा केल्या. तर दिल्लीकडून शिखा पांडे आणि मीनू मणी यांनी 1-1 विकेट घेतली. डब्ल्यूपीएलचा हा दुसरा हंगामातील सामना आरसीबीनं जिंकलाय. मुंबई इंडियन्स (MI) पहिल्या सत्रात चॅम्पियन ठरला होता. दोन्ही वेळा दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
- कोहलीला 16 वर्षात जमलं नाही : दुसरीकडं, आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 हंगाम झाले आहेत. त्यात आरसीबीच्या पुरुष संघानं एकदाही विजेतेपद जिंकलेलं नाही. अशा स्थितीत मुलींच्या यशामुळं विराट कोहली आणि पुरुष संघावर विजेतेपद पटकावण्याचं दडपण वाढणार आहे.
दिल्लीच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी : या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा संपूर्ण संघ 18.3 षटकांत 113 धावांवरच मर्यादित राहिला. दिल्लीसाठी शेफाली वर्मानं सर्वाधिक 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली. तर कर्णधार मेग लॅनिंगनं 23 धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलनं 4 आणि सोफी मोलिनेक्सनं 3 बळी घेत दिल्लीची फलंदाजी उद्धवस्त केली.
चांगल्या सुरुवातीनंतर डाव गडगडला : या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. संघानं 7 षटकांत एकही विकेट न गमावता 64 धावा केल्या होत्या. पण इथून फिरकीपटू सोफी मोलिनक्सनं कहर केला. पहिल्या 4 चेंडूत 3 विकेट घेत आरसीबीचं पुनरागमन केलं. शेफाली (44) सीमारेषेवर झेल बाद झाली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि ॲलिस कॅप्सी खातं न उघडता बाद झाल्या. सोफीनं दोघांना क्लीन बोल्ड केलं. त्यांना 74 च्या धावांवर चौथा धक्का बसला. श्रेयंका पाटीलनं कर्णधार मेग लॅनिंगला (23) एलबीडब्ल्यू बाद केलं. यानंतर आशानं त्याच षटकात मारिजाने केप (8) आणि जेस जोनासेन (3) यांना आऊट केलं. या सततच्या धक्क्यांतून दिल्लीचा संघ सावरू शकला नाही.
हेही वाचा :
- Ranji Trophy 2024 Final : रणजीमध्ये मुंबईच 'अजिंक्य', 15 धावांत 5 विकेट्स घेत विदर्भाचा 169 धावांनी पराभव; 42व्यांदा जिंकली स्पर्धा