नवी दिल्ली WTC Points Table Update : पाकिस्तान क्रिकेट सध्या अत्यंत खराब परिस्थितीतून जात आहे. पाकिस्तानी संघ इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हरला आहे. पाकिस्ताननं पहिल्या डावात फलंदाजी करताना 550 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरही संघाला डावानं पराभवाला सामोरं जावं लागलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत ही मालिका खेळवली जात आहे. मोठी गोष्ट म्हणजे हा सामना हरल्यानंतर पाकिस्तानी संघ आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या विजयाचा फायदा इंग्लंडला झाला आहे. त्याचा पीसीटी वाढला आहे. पाकिस्तानसाठी लज्जास्पद बाब म्हणजे आता हा संघ गुणतालिकेत तळाला फेकला गेला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल : इंग्लंडनं पाकिस्तानवर मोठा विजय मिळवल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. मात्र, याचा भारतीय संघावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतीय संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि 47 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान संघ आता WTC मध्ये तळाशी फेकला गेला आहे. संघाला आता नवव्या क्रमांकावर जावं लागलं यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल.