बार्बाडोस West Indies Fielded 10 Players : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. ब्रिजटाऊनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफनं लाइव्ह मॅचदरम्यान फील्ड सेटिंगवरुन कर्णधार शाय होपशी भांडण केलं आणि मैदान सोडलं. त्याच्या अचानक बाहेर पडल्यामुळं वेस्ट इंडिज संघाला केवळ 10 खेळाडूंसह खेळावं लागलं. पहिल्या डावातील चौथ्या षटकात ही घटना घडली. अल्झारीनं स्लिप काढून पॉइंटच्या दिशेनं फील्ड करण्याचे संकेत दिले पण कॅप्टन होपनं त्याचं ऐकलं नाही. त्यामुळं तो चिडला होता.
रागात घेतली विकेट : या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 3 षटकांत अवघ्या 10 धावा देत विकेट संपादन केली. त्यानंतर चौथ्या षटकासाठी अल्झारी जोसेफ गोलंदाजीसाठी आला. कर्णधार शाय होपनं नव्या फलंदाजाला दोन स्लिप्स दिल्या. अल्झारीनं पहिला चेंडू आऊट साइड, बॅक ऑफ लेन्थवर टाकला. यानंतर एक स्लिप काढून पॉइंटवर ठेवण्याची मागणी केली. पण होपनं त्याचं ऐकलं नाही. दुसरा चेंडूही ऑफ दिशेला टाकल्यानंतर अल्झारीनं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली, असं असतानाही फील्ड बदलली नाही. यावर तो चांगलाच संतापला आणि तिसऱ्या चेंडूवर वेगानं बाऊन्सर मारुन त्यानं जॉर्डन कॉक्सला झेलबाद करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.