दुबई West indies and Sri Lanka not in Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आजपासून सुरु होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ एकमेकांसमोर येतील. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. यात अफगाणिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे, ज्यांना वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आलं आहे. परंतु जर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघ त्यात का खेळत नाहीत, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघ न खेळण्यामागील खरं कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आठ संघ सहभागी : चॅम्पियन्स ट्रॉफीसह, जवळजवळ 29 वर्षांनी आयसीसी स्पर्धा पाकिस्तानमध्ये परतत आहे. याआधी 1996 चा वनडे विश्वचषक पाकिस्तानमध्ये झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानला कोणत्याही आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली नाही. तसंच, चॅम्पियन्स ट्रॉफी जवळजवळ आठ वर्षांनी होणार आहे, त्यामुळं त्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी होणारे आठ संघ म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान. पण त्यात श्रीलंका आणि वेस्ट इंडिजची नावं नाहीत. हे जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघ मानले जातात. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेनं 2002 मध्ये भारतासोबत संयुक्तरित्या ही स्पर्धा जिंकली होती तर वेस्ट इंडिजनं 2004 मध्ये या चषकावर आपलं नाव कोरलं होतं.
वनडे विश्वचषकाच्या आधारे होते संघांची निवड : खरंतर, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अव्वल 8 संघ सहभागी होतात. हे आठ संघ कोणते असतील, हे याआधी खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकावर बरंच अवलंबून आहे. यापूर्वी, 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी उपांत्य फेरी गाठली होती. म्हणजे येथून चार संघ ठरवण्यात आले. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे, त्यामुळं यजमान म्हणून त्यांचा प्रवेश करण्यात आला. म्हणजे हे पाच संघ झाले. याशिवाय, जर आपण आणखी तीन संघांबद्दल बोललो तर, त्यांचा निर्णय जागतिक पॉइंट टेबल पाहून घेण्यात आला.
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज बाहेर : 2023 च्या वनडे विश्वचषकात अफगाणिस्तान संघ सहाव्या स्थानावर होता. यानंतर, इंग्लंडनं सातव्या क्रमांकावर आपली मोहीम संपवली. बांगलादेश संघ आठव्या क्रमांकाचं स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. श्रीलंकेनं 2023 चा वनडे विश्वचषक देखील खेळला होता, परंतु संघ पहिल्या 8 मध्ये नव्हता. या स्पर्धेत श्रीलंकेचा संघ 9 व्या क्रमांकावर होता. म्हणूनच त्यांना बाहेर काढण्यात आलं. जर आपण वेस्ट इंडिजबद्दल बोललो तर वेस्ट इंडिज 2023 च्या वनडे विश्वचषकासाठीही पात्र ठरु शकला नव्हता. आता तुम्हाला समजलं असेल की जगातील दोन बलाढ्य क्रिकेट संघ या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग का नाहीत.
हेही वाचा :
- 1 ट्रॉफी, 8 संघ, 15 सामने, 19 दिवस... आजपासून सुरु होणार 'मिनी वर्ल्ड कप'; 'फ्री'मध्ये सामने कसे पाहणार?
- 'कीवीं'विरुद्ध पहिलाच विजय मिळवत गतविजेते स्पर्धेत विजयी सुरुवात करणार? 'फ्री'मध्ये पहिली मॅच 'इथं' पाहा Live