मुंबई Why MS Dhoni Retain in 4 Crore : IPL 2025 च्या लिलावापूर्वी प्रत्येक संघानं रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली. यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन यांसारखे मोठे खेळाडू आता आयपीएल 2024 मध्ये ज्या संघांसाठी खेळले होते, त्यांच्यासोबत नाहीत. या चौघांना त्यांच्या संघानं कायम ठेवलेलं नाही. तसंच एमएस धोनीसारख्या खेळाडूला कायम ठेवलेल्या यादीत 8 कोटी रुपयांपर्यंत नुकसान सहन करावं लागलं आहे. या यादीत जर कोणाला फायदा होताना दिसत असेल तर तो म्हणजे जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि हेनरिक क्लासेन.
कोलकाता आणि राजस्थाननं 6-6 खेळाडूंना केलं रिटेन : सर्व फ्रँचायझींनी गुरुवारी, 31 ऑक्टोबर रोजी IPL 2025 साठी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंच्या याद्या जाहीर केल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सनं सर्वाधिक 6-6 खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर पंजाब किंग्जनं केवळ दोन खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवलं आहे. मात्र कायम ठेवताना केवळ कोणाला कायम केलं याचीच चर्चा होत नाही, तर किती रुपयांत कायम ठेवले याचीही चर्चा होत आहे. यावरुन त्यांच्या संघातील स्थानाचाही अंदाज लावता येईल.
धोनीला मिळतील फक्त 4 कोटी रुपये : महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्जनं गेल्या मोसमात 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं होतं. या मोसमात त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आलं आहे. अशाप्रकारे त्याला केवळ 4 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं. परिणामी त्याचं आठ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. गेल्या मोसमात त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून 12 कोटी रुपये मिळाले होते. मात्र IPL च्या नवीन नियमांनुसार अनकॅप्ड खेळाडूला जास्तीत जास्त 4 कोटी रुपये दिले जाऊ शकतात. हे अनकॅप्ड खेळाडू दोन प्रकारचे असतात. एक ते ज्यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि दुसरे ते ज्यांनी 5 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.