हैदराबाद Manu Bhaker Paris Olympics 2024 : भारतीय नेमबाज मनू भाकरनं रविवारी (28 जुलै) इतिहास रचला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिनं आपल्या कामगिरीनं कांस्यपदक जिंकलं. ऑलिम्पिकच्या इतिहासात महिलांच्या नेमबाजीत कोणतंही पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला ठरली. मनू भाकरचा या पदकापर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाही. जाणून घ्या मनूचा संघर्षमय प्रवास....
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तुटलं होतं पिस्तूल : मूळची हरियाणातील असलेल्या मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. तिनं टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, 10 मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत तिचं पिस्तूल तुटलं. या कारणामुळं तिला त्यावेळी पदक जिंकता आलं नाही. पण यावेळी मनूनं पूर्ण ताकद दाखवत अडचणींवर मात करत पदकावर 'निशाणा' साधला. 22 वर्षीय मनू भाकर पॅरिस 2024 ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेत आहे. 21 सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव ॲथलीट आहे जी अनेक वयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेते.
डोळ्याच्या दुखापतीनंतर बॉक्सिंग सोडलं : हरियाणातील झज्जर इथं जन्मलेल्या मनू भाकरनं शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला. याशिवाय 'थान टा' नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेतला. तिनं राष्ट्रीय स्तरावर पदकं पटकावली. बॉक्सिंगदरम्यान मनूच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला. पण मनूला खेळाची वेगळी आवड होती, त्यामुळं ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली.