पुणे Visiting Teams Won Test Series in India : न्यूझीलंड क्रिकेट संघानं दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा 113 धावांनी पराभव करुन इतिहास रचला. यासह न्यूझीलंडला प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात यश आलं आहे. तोच दुसरीकडे सलग 18 कसोटी मालिकेतील भारताचा हा पहिलाच पराभव आहे. अशाप्रकारे कीवी संघानं मायदेशात सलग 18 कसोटी मालिकेतील भारताची विजयी मालिका खंडित केली. न्यूझीलंडनं बेंगळुरु कसोटी जिंकून पुणे कसोटीही जिंकली आणि 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यासह न्यूझीलंड भारतात कसोटी मालिका जिंकणारा सहावा परदेशी संघ ठरला.
इंग्लंडनं 5 वेळा केला पराक्रम : भारतीय भूमीवर 5 वेळा कसोटी मालिका जिंकण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला आहे. इंग्लंड संघानं शेवटच्या वेळी 2012-13 मध्ये भारतात घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकण्याचा मोठा पराक्रम केला होता. इंग्लंडनं 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता. ॲलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं पहिला सामना गमावल्यानंतर सलग 2 कसोटी सामने जिंकून मालिका जिंकली. शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. इंग्लंड संघानं आतापर्यंत भारतात 5 वेळा कसोटी मालिका जिंकली आहे.
वेस्ट इंडिजनंही 5 वेळा जिंकली मालिका : इंग्लंडप्रमाणेच वेस्ट इंडिज क्रिकेट संघानंही भारतात 5 वेळा कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र 1983-84 मध्ये वेस्ट इंडिजनं भारतीय भूमीवर शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्या मालिकेत क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव होते.