महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित होता एका वर्षाचा, कोहली 24 दिवसांचा; न्यूझीलंडनं भारतात कधी जिंकला होता शेवटचा कसोटी सामना?

भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी कीवी संघ सामना जिंकत इतिहास रचण्याची संधी आहे.

By ETV Bharat Sports Team

Published : 9 hours ago

Last Time New Zealand Won A Test Match
भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ (IANS and AFP Photo)

बेंगळुरु Last Time New Zealand Won A Test Match in India : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. आता आज सामन्याच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य मिळालं आहे. तर भारताला 10 विकेट घ्यायच्या आहेत. भारताच्या दुसऱ्या डावात 462 धावा झाल्या. आता आज पाचव्या दिवशी कीवी संघ सामना जिंकत इतिहास रचणार की भारतीय संघ सामना जिंकत घरच्या मैदानावर आपलं वर्चस्व कायम ठेवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. मात्र न्यूझीलंडनं भारतात शेवटचा कसोटी सामना कधी जिंकला हे तुम्हाला माहीत आहे का?

1988 मध्ये जिंकला कसोटी सामना : तसं पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 60 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात भारतानं 21 कसोटी सामने जिंकले तर न्यूझीलंडनं 13 कसोटींत विजय मिळवला. तर दोन्ही संघात 26 सामने अनिर्णित राहिले. वास्तविक, न्यूझीलंडनं 1988 मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर पुढील 36 वर्षांत आजपर्यंत न्यूझीलंडनं भारतात 16 कसोटी सामने खेळले, पण त्यांना एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. 1988 मध्ये न्यूझीलंडनं भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. हा सामना 24 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 1988 दरम्यान मुंबईत खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार जॉन राईट होता तर भारतीय संघाचं नेतृत्व दिलीप वेंगसरकरच्या खांद्यावर होतं.

न्यूझीलंडनं जिंकली नाणेफेक :वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार जॉन राइटनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जॉन ब्रेसवेल (52), मार्क ग्रेटबीच (46), कर्णधार जॉन राइट (33) आणि डॅनी मॉरिसन (27*) यांच्या खेळीमुळं न्यूझीलंडनं पहिल्या डावात 236 धावा केल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 93.3 षटकांत 236 धावांत आटोपला. भारताकडून रवी शास्त्रीनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नरेंद्र हिरवाणीनं तीन तर कपिल देवनं दोन गडी बाद केले. अर्शद अयुबला एक विकेट मिळाली.

श्रीकांत आणि रिचर्ड हॅडलीची जादू : यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताकडून सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांतनं 137 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 94 धावांची शानदार खेळी केली. भारताकडून अर्धशतक करणारा तो एकमेव फलंदाज होता. याशिवाय केवळ रवी शास्त्री (32), किरण मोरे (28) आणि कर्णधार दिलीप वेंगसरकर (25) यांनी काही धावांचं योगदान दिलं. परिणामी भारताचा पहिला डाव 75.5 षटकांत 234 धावांवर आटोपला. न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज रिचर्ड हॅडली यानं 20.5 षटकांत 8 मेडन्ससह 49 धावा देऊन 6 बळी घेतले. के श्रीकांतशिवाय हेडलीनं अरुण लाल (9), कपिल देव (7), किरण मोरे, अर्शद अयुब (10) आणि रशीद पटेल यांना आपला बळी बनवले होते. याशिवाय एव्हॉन चॅटफिल्ड आणि जॉन ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

अयुब-हिरवानी यांची उत्तम कामगिरी :पहिल्या डावाच्या आधारे भारतावर 2 धावांची आघाडी मिळवल्यानंतर न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात जोरदार पलटवार केला. अँड्र्यू जोन्स (78), इयान स्मिथ (54), कर्णधार जॉन राइट (36), मार्क ग्रेटबेच (31) आणि जॉन ब्रेसवेल (32) यांनी उपयुक्त योगदान दिलं. तर भारताकडून अर्शद अयुबनं 33 षटकांत 50 धावा देत 5 बळी घेतले. अयुबनं अँड्र्यू जोन्स, केन रदरफोर्ड (17), टोनी ब्लेन (5), इयान स्मिथ आणि जॉन ब्रेसवेल यांना आपला बळी बनवलं. अयुबला हिरवाणीची चांगली साथ लाभली, त्यानं 38 षटकांत 93 धावांत चार बळी घेतले. हिरवाणीनं जॉन राईट, मार्क ग्रेटबीच, रिचर्ड हॅडली (18) आणि डॅनी मॉरिसन यांना आपला बळी बनवलं. परिणामी न्यूझीलंडचा दुसरा डाव 115 षटकांत 279 धावांत आटोपला.

न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय : आता भारतीय संघाला विजयासाठी 282 धावांचं कठीण लक्ष्य मिळालं होतं. भारताचा पहिल्या डावातील हिरो श्रीकांत दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. रिचर्ड हॅडलीनं त्याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. यानंतर भारतीय फलंदाजांची 'तू चल मैं आया' अशी स्थिती पाहायला मिळाली आणि एक एक करुन भारतीय फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसले. दुसऱ्या डावात अरुण लाल (47), मोहम्मद अझरुद्दीन (21) आणि कपिल देव (36) यांनी भारताकडून काहीशी झुंज दिली. भारताचा दुसरा डाव 49.4 षटकांत 145 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून रिचर्ड हॅडलीनं 4 तर जॉन ब्रेसवेलनं 6 विकेट घेतल्या. सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी जॉन ब्रेसवेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. भारतानं तीन सामन्यांची ही मालिका 2-1 नं जिंकली.

36 वर्षांनंतर न्यूझीलंडला इतिहास रचण्याची संधी : या सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची गरज आहे. तसंच काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आता भारताच्या मदतीला पाऊस धावणार की कीवी संघ 36 वर्षांची प्रतिक्षा संपवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रोहित होता एका वर्षाचा, तर कोहली 24 दिवसांचा : यात मजेशीर बाब म्हणजे जेव्हा कीवी संघानं शेवटच्या वेळी भारतात कसोटी सामना जिंकला होता, तेव्हा सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या एका वर्षाचा होता तर दिग्गज फलंदाज विराट कोहली अवघ्या 24 दिवसांचा होता. विशेष म्हणजे सध्याचे आघाडीचे फलंदाज स्टीव्ह स्मिथ, जो रुट, केन विलियम्सन आणि बाबर आझम यांचा तर जन्मही झाला नव्हता. तर सध्याच्या कीवी संघातील एजाज पटेल या एकमेव खेळाडूचा जन्म झाला होता. इतकच काय तर तेव्हा T20 क्रिकेटची कोणी कल्पनाही केली नव्हती.

ABOUT THE AUTHOR

...view details