दुबई Happy Birthday T20I Cricket : गेल्या काही वर्षांत T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटला आवडणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. हेच कारण आहे की आता अनेक देशांमध्ये T20 लीग आयोजित केली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु होऊन आज 20 वर्ष पुर्ण झाले आहेत. खरंतर, पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 17 फेब्रुवारी 2005 रोजी खेळला गेला होता, ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर होते. या ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 44 धावांनी शानदार विजय मिळवला. हा सामना ऑकलंडमधील ईडन पार्क स्टेडियमवर झाला. या सामन्यात कांगारु संघाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग होता आणि किवी संघाचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंग होता.
पॉन्टिंगची तुफानी खेळी : या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिकी पॉन्टिंग (नाबाद 98) च्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 5 बाद 214 धावांचा मोठा डोंगर उभा केला. पॉन्टिंगनं 55 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच वेळी, चांगली सुरुवात असूनही न्यूझीलंड संघ लक्ष्य गाठू शकला नाही. स्कॉट स्टायरिस (66) आणि ब्रेंडन मॅक्युलम (36) यांच्या महत्त्वपूर्ण खेळी असूनही किवी संघ 20 षटकांत 170 धावांतच बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मायकेल कॅस्प्रोविचनं 4 आणि ग्लेन मॅकग्रानं 2 विकेट घेतल्या. पॉन्टिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.