नवी दिल्ली Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरु होण्यासाठी आता फक्त 4 दिवस उरले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी होणार आहे. यानंतर या स्पर्धेत एकूण 117 भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहायला मिळणार आहे. त्याआधी आज आम्ही तुम्हाला ऑलिम्पिक गावाबद्दल सांगणार आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला ऑलिम्पिक गाव म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी झाली आणि याआधी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू कुठं थांबांयचं ते सांगणार आहोत.
ऑलिम्पिक गाव म्हणजे काय : ऑलिम्पिक खेळांसाठी ऑलिम्पिक गाव बांधण्यात आलं आहे. ज्याठिकाणी खेळ होणार आहेत, त्याठिकाणाजवळ खेळाडूंसाठी एक जागा तयार करण्यात आली आहे, ज्यात खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याच खेळाडूंच्या निवासस्थानाला ऑलिम्पिक गाव म्हणतात. या ऑलिम्पिक गावात देशातील तसंच जगातील सर्व खेळाडू एकत्र येतात.
ऑलिम्पिक गाव कधी सुरु झाले : सुरुवातीच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खेळाडूंसाठी ऑलिम्पिक गाव नव्हतं. त्यापैकी काही हॉटेल्स किंवा विद्यार्थी वसतीगृहात थांबले होते. तर इतरांनी शाळांमध्ये स्वस्त निवासाचा पर्याय निवडला होता. लॉस एंजेलिस इथं 1932 च्या खेळांसाठी पहिलं ऑलिम्पिक गाव बांधलं गेलं. 37 देशांतील खेळाडूंनी (केवळ पुरुष) एकत्र जेवले, झोपले आणि प्रशिक्षण घेतलं. काही सामुदायिक सेवा प्रथमच प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये हॉस्पिटल, फायर स्टेशन आणि पोस्ट ऑफिस आहे. सुरुवातीच्या काळात महिला ऑलिम्पिक गावात न राहता हॉटेलमध्ये राहात होत्या.