महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

3 वर्षात, 4 कर्णधार 26 निवडकर्ते आणि 8 प्रशिक्षक... क्रिकेट की सर्कस? गल्ली क्रिकेटमध्येही असं घडत नाही

गेल्या तीन वर्षांत पाकिस्तान क्रिकेट संघानं चार कर्णधार, चार बोर्ड अध्यक्ष, आठ वेगवेगळे प्रशिक्षक आणि 26 वेगवेगळे निवडक पाहिले. यामुळं संघाच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचं दिसतंय.

Pakistan Cricket Spectacle
पाकिस्तान क्रिकेट संघ (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 29, 2024, 12:31 PM IST

Updated : Oct 29, 2024, 12:41 PM IST

Pakistan Cricket Spectacle : पाकिस्तान क्रिकेटमध्ये जेंव्हा काही चांगलं घडतं तर त्याच्या काही काळानंतर वाईटही होतं. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट संघानं इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, शान मसूदच्या संघानं जबरदस्त पुनरागमन केलं आणि पुढील दोन कसोटी सामने जिंकले. परिणामी पाकिस्तानला बऱ्याच कालावधीनंतर घरच्या मैदानावर विजयाची चव चाखायला मिळाली. मात्र, याच्याच काही दिवसांनी मोठा वाद चव्हाट्यावर आला. संघाचे वनडे आणि T20 प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्याकडे वनडे T20 ची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

संघात सतत बदल : पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझमच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा वनडे आणि T20 चा नवा कर्णधार झाला आहे. शान मसूदकडं आधीच कसोटी संघाची जबाबदारी आहे. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तान क्रिकेट संघानं चार कर्णधार, चार बोर्ड अध्यक्ष, आठ वेगवेगळे प्रशिक्षक आणि 26 वेगवेगळे निवडक पाहिले आहेत. एहसान मणी 2021 मध्ये बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यापासून संघात सतत बदल होत आहेत. पीसीबीचा राजकीय प्रभावही या बदलांमध्ये मोठी भूमिका बजावत आहे.

गॅरी कर्स्टन यांनी राजीनामा का दिला? : गॅरी कर्स्टन यांना दोन वर्षांच्या करारावर पाकिस्तान संघाचे व्हाईट बॉल प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. परंतु, अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला. रिपोर्ट्सनुसार कर्स्टन आणि पीसीबीमध्ये संघ निवडीबाबत मतभेद होते. नव्या निवड समितीनं प्रशिक्षक आणि कर्णधाराला हटवून संघ निवडीचे अधिकारही आपल्या ताब्यात घेतले आहेत. नव्या निवड समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आकिब जावेदला बरेच अधिकार देण्यात आले आहेत. ते निवड समितीचे अध्यक्ष नाहीत, पण त्यांच्याकडे बहुतांश अधिकार आहेत. त्यांच्यासोबत माजी पंच अलीम दार, माजी कर्णधार अझहर अली, माजी क्रिकेटपटू असद शफीक, विश्लेषक हसन चीमा हे देखील निवडकर्ते आहेत.

प्रशिक्षक आणि अध्यक्षही बदलले : 2021 पासून, कर्स्टन हे आठवे व्यक्ती होते ज्यांची पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मिसबाह उल-हक, मोहम्मद हाफीज आणि सकलेन मुश्ताक या देशांतर्गत खेळाडूंनाही ही जबाबदारी देण्यात आली होती. कर्स्टन आणि मिकी आर्थर सारख्या मोठ्या नावाच्या परदेशी खेळाडूंनाही संघात सामील करण्यात आलं. परंतु कोणीही फार काळ टिकू शकलं नाही. या काळात पीसीबीच्या अध्यक्षपदावर नवीन लोक विराजमान होत राहिले. रमीझ राजा, नजम सेठी, झका अश्रफ आणि मोहसिन नक्वी यांनी 2021 पासून पदभार स्वीकारला. अध्यक्ष बदलताच कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीही बदलण्यात आली.

शाहिद आफ्रिदी आणि इंझमामही झाले निवडकर्ते : या कालावधीत मुख्य निवडकर्ते आणि 26 समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाहिद आफ्रिदी आणि इंझमाम उल-हकपासून वहाब रियाझपर्यंत यापैकी काही नावं आश्चर्यकारक आहेत. त्यांच्यापैकी अनेकांवर हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप आहेत. कर्णधारपदात खूप झपाट्यानं बदल झाले आहेत. बाबर आझम हा काही काळापूर्वी सर्व फॉरमॅटचा कर्णधार होता, पण नंतर त्याची जागा वनडे आणि T20 मध्ये शाहीन शाह आफ्रिदी आणि नंतर कसोटी सामन्यांमध्ये शान मसूदनं घेतली. एका मालिकेनंतर शाहीनला काढून टाकण्यात आलं आणि पुन्हा बाबरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. आता त्यानं राजीनामा दिला आणि मोहम्मद रिझवानकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आली.

संघाचा समतोल ढासळत चालला :बाबर आझमला कर्णधारपदावरुन काढून टाकणं, नंतर त्याला परत आणणं आणि पुन्हा काढून टाकणं, या सगळ्याचा परिणाम पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर होत आहे. नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदीसारख्या युवा वेगवान गोलंदाजांचा योग्य वापर केला जात नाही. सततच्या बदलांमुळं संघाचा समतोल बिघडत आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सातत्यानं होत असलेल्या बदलांचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवरही होत आहे. भविष्यात पाकिस्तान क्रिकेट कोणत्या दिशेनं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2021 पासून PCB मध्ये झालेले मोठे बदल :

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष :

  • रमिझ राजा : 2021-22
  • नजम सेठी : 2022-23
  • झका अश्रफ : 2023-24
  • मोहसीन नक्वी : 2024 पासून

संघाचे प्रशिक्षक :

  • मिसबाह उल हक : 2019-21
  • सिकंदर बस्ती : 2021-22
  • सईद अजमल : 2022
  • साकिब मसूद : 2022-23
  • अब्दुल रहमान (अंतरिम) : 2023
  • ग्रँट ब्रॅडबर्न : 2023
  • मोहम्मद हाफीज : 2023-24
  • अझहर महमूद (अंतरिम) : 2024
  • गॅरी कर्स्टन (वनडे आणि T20) : 2024
  • जेसन गिलेस्पी (कसोटी) : 2024 पासून
  • जेसन गिलेस्पी (अंतरिम वनडे आणि T20) : 2024 पासून

संघाचे मुख्य निवडकर्ता :

  • मोहम्मद वसीम : 2020-22
  • शाहिद आफ्रिदी : 2022-23
  • हारुन रशीद : 2023-23
  • इंझमाम-उल-हक : 2023-23
  • वहाब रियाझ : 2023-24
  • आता मुख्य निवडकर्ता नाही : 2024 पासून

संघाचे कर्णधार :

  • बाबर आझम : 2020-23
  • शाहीन शाह आफ्रिदी (वनडे आणि T20) : 2024
  • शान मसूद (कसोटी) : 2024
  • बाबर आझम (पांढरा चेंडू) : 2024
  • मोहम्मद रिझवान (पांढरा चेंडू) : 2024 पासून

हेही वाचा :

  1. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाची 8 महिन्यांत दुसऱ्यांदा निवृत्ती; T20 विश्वचषक जिंकण्यात बजावली होती महत्त्वाची भूमिका
  2. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना स्टेडियममध्ये पाहायचा? मोबाईल रिचार्जपेक्षाही स्वस्त मिळतंय मॅचचं तिकिट, 'असं' करा खरेदी
Last Updated : Oct 29, 2024, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details